Twitter : @maharashtracity

मुंबई

मुंबईतील एका २७ वर्षीय महिलेवर अतिशय गुंतागुंतीची व तब्बल ३ तास चाललेली प्रसूती शस्त्रक्रिया मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रूग्णालयात करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे गर्भवती महिलेसह बाळाचाही जीव वाचविण्यात आला. गर्भ आवरणाच्या समस्येमुळे या महिलेच्या व गर्भाच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला होता. मात्र कूपर रुग्णालयाच्या वैद्यकीय टिमने प्रसूतिपूर्व देखरेख, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया व प्रसूति पश्चात उपचाराचे टप्पे निष्णातपणे पार पाडल्याने आईसह बाळाचा जीव वाचला. साधारणतः एक हजार प्रसूतिमागे अशी एखादी अत्यंत धोकादायक ठरु शकणारी व जीवावर बेतू शकेल, अशी प्रसूति शस्त्रक्रिया आढळून येते. त्यामुळे ही प्रसूती ही दुर्मिळ स्वरुपाची होती.

दरम्यान, गर्भ आवरण वेगाने वाढून गर्भाशयाला चिकटल्याने गर्भवती महिलांना प्रसूतिदरम्यान अतिरक्तस्रावाचा धोका निर्माण होतो. तसेच प्रसंगी गर्भ व नाळ खालच्या बाजूस सरकून शरीरात गुंतागुंत निर्माण होते. अशावेळी गर्भवती व गर्भ या दोहोंना जीवावर बेतू शकते. अशा प्रकारची धोकादायक स्थिती निर्माण झालेल्या एका महिलेला तीन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयात यशस्वी प्रसुती करण्यात आली. या महिलेची पूर्वी देखील दोन वेळा सीझरने प्रसूति झाली असल्याने गर्भाशयाची नैसर्गिक रचना बिघडलेली होती.

सुमारे आठवडाभर निरनिराळे वैद्यकीय परीक्षण केल्यानंतर आढळलेल्या निरीक्षणानुसार, महिलेच्या जीवाला स्पष्ट धोका दिसत असला तरी गर्भ धारणेनंतर २५ आठवड्यांचा कालावधी उलटल्याने गर्भपात करणे देखील शक्य नव्हते. महिलेच्या कुटुंबीयांच्या संमतीने कूपर रूग्णालयातच प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला. गर्भधारणेला ३६ आठवडे उलटत असतानाच आत्यंतिक वेदना होवू लागताच मध्यरात्री ही महिला कूपर रुग्णालयात दाखल झाली. रुग्णालयातीचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांच्या मार्गदर्शंनाखाली प्रसूतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रिना वाणी, डॉ. रश्मी जलवी, भूलतज्ज्ञ डॉ. नैना दळवी व सहकाऱ्यांसह ३ डॉक्टर्स, ३ भूलतज्ज्ञ व २ परिचारिका अशा अकरा जणांच्या पथकाने तब्बल ३ तास चाललेली ही जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी केली.

१४ बाटल्यांचा रक्तपुरवठा
या संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान सुमारे अडीच लीटर इतका रक्तस्राव झाला. एरवी अशाप्रकारच्या शस्त्रक्रियेदरम्यान २० ते ३० बाटल्या रक्तपुरवठा करावा लागू शकतो. मात्र त्या तुलनेत या महिलेला रक्त, प्लाझ्मा व प्लेटलेटस् हे सर्व मिळून १४ बाटल्या इतकाच पुरवठा करावा लागला. प्रसूतिदरम्यान या महिलेने सुमारे २.६७० किलोग्रॅम वजनाच्या सुदृढ मुलीला जन्म दिला. बाळाला आणि या महिलेला धोक्यातून बाहेर काढल्यानंतर ३ दिवस त्यांना अतिदक्षता उपचार कक्षांमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. त्यानंतर पुढील १७ दिवस सामान्य कक्षामध्ये देखरेख करण्यात आली. एकूण वीस दिवसांच्या वैद्यकीय उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने दोघांना घरी सोडण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here