By Sachin Unhalekar
Twitter : @Rav2Sachin
मुंबई: राज्य शासनाने नुकतेच नाटकांच्या प्रयोगासाठी नाट्यगृहांचे भाडे शुल्क 5 हजार रुपये केले असून हे भाडे शुल्क डिसेंबर 2023 पर्यंत लागू असणार आहे. मात्र भाडे शुल्कातील सवलत नाटक वागळता अन्य कलेच्या सादरीकरणासाठी लागू नसल्याने कलाकारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. यासंदर्भात maharashtra.city ने 24 मे 2023 रोजी “नाटकासाठी भाडे शुल्कात सवलत ; अन्य कलांना दुजाभाव” या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. यावर आता नामवंत आणि ज्येष्ठ कलावंतांनी maharashtra.city कडे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठ शाहीर बजरंग आंबी, शाहीर सम्राट देवानंद माळी, ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, ऑर्केस्ट्रामधील ज्येष्ठ प्रा. कृष्ण कुमार गावंड आणि महाराष्ट्र राज्यातील पहिली ढोलकीपट्टू सन्मानित देवयानी मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नाट्यगृहाच्या भाडे शुल्कात नाटकांसाठीच सवलत दिली गेलेली आहे. अन्य कलेला शुल्कात सवलत नाही. असा दुजाभाव का?, असा प्रश्न ज्येष्ठ शाहीर बजरंग आंबी यांनी उपस्थित केला आहे. सांस्कृतिक विभागातर्फेही कार्यक्रम देताना दुजाभाव होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ठराविक मर्जीतील ग्रुप आणि संस्थानाच कार्यक्रम दिलेले जातात. तेच लोक वारंवार कार्यक्रम सादर करत असल्याने इतरांना वंचित राहावे लागते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
नाट्यगृहाच्या भाडे शुल्कात नाटकांसाठीच सवलत दिली गेली आहे, त्या धर्तीवर शाहीरगीरी, लोककला, तमाशगीरी यांचा ही विचार करणे आवश्यक आहे. कारण शाहीरी, लोककला, तमाशा ही कला आपल्या मातीतील कला आहे. तर शासनाने शाहिरीचा जरूर विचार केला पाहिजे. पण नुसता विचार करुन चालणार नाही. तर शासनाने आमच्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करणे आवश्यक आहे, अशी सूचना ही शाहीर सम्राट डॉ. देवानंद माळी यांनी केली आहे.
ऑर्केस्ट्रामधील ज्येष्ठ प्रा. कृष्ण कुमार गावंड यांनी जुन्या आठवणी व्यक्त करतानाच कला क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन समस्या दूर करणे आवश्यक आहे. यातून सर्वांमध्ये सलोखा निर्माण होईल,असा एक मोलाचा सल्ला आपल्या प्रतिक्रियेतून दिला.
संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांनी संख्या लाखोंच्या आसपास आहे. त्यामुळे संबंध कलाकारांसाठी एकच नियम करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्यातील पहिली ढोलकीपट्टू सन्मानित देवयानी मोहोळ यांनी व्यक्त केली आहे.
नाट्यगृहाच्या भाडे शुल्क नाटकांसाठीच केवळ पाच हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने कलाकार आम्हाला प्रश्न विचारू लागले आहेत. नाटकांच्या प्रयोगासाठी सवलत अन्य कलेला सवलत का नाही, असा प्रश्न उपस्थित झाल्याने अन्य कलेतील कलाकार हे कलाकार नाहीत का असा प्रश्न उपस्थित करत सर्व कलेला समान न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिला आहे.