अरविंद केजरीवाल यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

By Anant Nalavade

Twitter : @nalavadeanant

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने दिल्लीच्या कारभाराबाबत जारी केलेल्या वटहुकूमाला राज्यसभेत मंजुरी मिळू नये यासाठी आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याची ग्वाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना येथे दिली. त्याचवेळी जनतेला जागे करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असेही ठाकरे यांनी सांगितले.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पाठोपाठ अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या शैलीत भाजपवर जोरदार टीका केली. नाती जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध आहे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन आम्ही नाती जपतो. मात्र या नात्यात काही लोकांनी केवळ राजकारण केले. केजरीवाल दुसऱ्यांदा मातोश्रीवर आले आहेत. दिल्लीसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय लोकशाहीसाठी आवश्यक होता. परंतु केंद्र सरकारने अध्यादेश आणला, ही कसली लोकशाही? कदाचित असेही दिवस येतील की राज्यात निवडणुका न होता केंद्रात निवडणूक होतील. फारतर २०२४  पर्यंत निवडणुका होतील, अशी भीती ठाकरे यांनी व्यक्त केली.

देशातील लोकशाही जपण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. यासाठी देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. यंदाचे वर्ष निवडणुकीचे आहे. त्यामुळे विरोधकांची यावेळी जर गाडी सुटली तर देशातून लोकशाहीच गायब होईल, असा सूचक इशाराही ठाकरे यांनी दिला.

ठाकरे घराणे हे मैत्री जपणारे आहे. आपल्यात आता मैत्रीचे बंध निर्माण झाले आहेत. एकदा मैत्री केली की ठाकरे मागे पुढे पाहत नाहीत. राजकारणापलीकडे नाती जपण्यासाठी ‘मातोश्री’ प्रसिद्ध आहे. केंद्र सरकार विरोधातल्या संघर्षात दिल्ली सरकारच्या बाजूने आम्ही ठामपणे उभे राहू. ज्यावेळी राज्यसभेत यावर मतदान होईल, त्यावेळी शिवसेनेचे खासदार दिल्ली सरकारच्या बाजूने मतदान करतील, असा शब्दही ठाकरे यांनी केजरीवाल यांना दिला.

अध्यादेशाचा निर्णय अहंकारातून आला आहे. अहंकारी आणि स्वार्थी माणूस देश चालवू शकत नाही. दिल्लीच्या लढाईत उद्धव ठाकरेंची साथ मिळाली आहे, अशा शब्दात अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली. आम्ही देखील नाती जपणारे, निभावणारे आहोत. आम्ही आता ठाकरे कुटुंबाचा भाग आहोत. दिल्लीच्या लोकांनी आपल्या अधिकारांसाठी मोठी लढाई लढली. मोदी सरकारने अध्यादेश काढून आमची ताकद हिरावून घेतली. आठ वर्षांच्या लढ्यानंतर न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला. पण आठ दिवसांच्या आत सरकारने अध्यादेश काढून आमचे अधिकार काढून घेतले. अध्यादेशाचा निर्णय अहंकारातून आला आहे. अहंकारी आणि स्वार्थी माणून देश चालवू शकत नाही, अशी जळजळीत टीकाही केजरीवाल यांनी यावेळी केली.

हा प्रयोग यशस्वी होणार नाही

दरम्यान, केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांची एकमेकांच्या  गरजेतून भेट झाली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी अरविंद केजरीवाल कुणाही सोबत जायला तयार आहेत. उद्धव ठाकरे हेही कुणाही सोबत बसायला तयार आहेत. यावरुनच भाजपची ताकद किती आहे हे त्यांना समजले आहे. २०१९ ला ही असा प्रयोग करुन झाला आहे. विविध विधानसभांमध्येही हा प्रयोग करण्यात आला आहे. मात्र असा प्रयोग तेव्हाही यशस्वी झाला नाही आणि आताही यशस्वी होणार नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे-केजरीवाल भेटीवर केली.

हे लोक लोकशाही वाचवण्याच्या गोष्टी करत आहेत. परंतु हे लोक मूळात लोकशाही मानणारे नाहीत. लोकशाहीच्या गोष्टी करून हे लोक स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकशाही वाचवणे हा त्यांचा अजेंडा नसून केवळ नरेंद्र मोदींना पराभूत करणे हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here