शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन
By Anant Nalavade
Twitter : @nalavadeanant
मुंबई: “आप” चे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची दुपारी मुंबईतल्या वाय.बी.चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. लोकशाही वाचवण्यासाठी आणि संसदेत दिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला विरोध करण्यासाठी पाठिंबा देण्याची विनंती केजरीवाल यांनी केली असता राष्ट्रवादीचे खासदार या विधेयकाला संसदेत विरोध करतील, असे आश्वासनही पवार यांनी केजरीवाल यांना यावेळी दिले.
यावेळी केजरीवाल यांनी केंद्रातील भाजप सरकार आमदारांचा घोडेबाजार करत ईडी आणि सीबीआय सारख्या केंद्रीय एजन्सींचा वापर करून भय निर्माण करण्यासाठी आणि लोकप्रिय सरकारच्या विरोधात अध्यादेश जारी करून गैर भाजप सरकार पाडण्यासाठी अन्यायकारक मार्ग वापरत असल्याचे सांगितले. दिल्लीत कायदेशीररीत्या निवडून आलेल्या “आप” सरकारचे अधिकार मर्यादित करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली दुरुस्ती विधेयक २०२३ अंमलात आणले आणि त्या प्रभावाखाली एक अध्यादेश जारी केल्याची माहितीही पवार यांना दिली.
केजरीवाल यांनी शरद पवार हे देशातील सर्वात वरीष्ठ नेत्यांपैकी एक आहेत आणि त्यांनी संसदेत या विधेयकाला विरोध करण्यासाठी विरोधी पक्ष आणि इतर गैरभाजप पक्षांशी बोलले पाहिजे असे मतही व्यक्त केले.
यावेळी पवार यांनी दिल्लीतील आप सरकारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा जाहीर केला. असे अध्यादेश आणणे म्हणजे देशातील संसदीय लोकशाही मर्यादित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही पवार यांनी यावेळी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना केला. ५६ वर्षांच्या संसदीय जीवनात निवडून आलेल्या सरकारवर असा निर्लज्ज हल्ला कधीच पाहिला नाही. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट मतही पवार यांनी मांडले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांचा समावेश असलेल्या ‘आप’ च्या शिष्टमंडळाचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. या बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.