सिकलसेल निदानासाठी मायक्रोस्कोपी चाचणी

मुंबई आयआयटीकडून चाचणी उपकरण पेटंट

Twitter: @maharashtracity

मुंबई: सिकलसेल ऍनिमियाचे निदान ३० मिनिटांत करणे शक्य होणार असून पूर्वी यासाठी ४८ तास म्हणजे दोन दिवस लागत होते. आयआयटी मुंबईतील बायोसायन्सेस आणि बायोइंजिनियरिंग विभागातील प्रा. देबजानी पॉल आणि त्यांच्या टीमने विकसित केलेल्या मायक्रोस्कोपी आधारित चाचणी क्रांती घडवून आणणार आहे. तसेच यामुळे उपचार खर्च कमी होऊन बाधित रुग्णांसाठी सुविधाही सक्षम केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले. या मायक्रोस्कोपी चाचणीमुळे ३० मिनिटांच्या आत सिकल अॅनिमियाचे निदान करणे शक्य आहे. पीओएस (पॉइंट ऑफ स्क्रीनिंग) तंत्रज्ञानासह सिकलसेलच्या या चाचणीला अभिनव रूप देण्यासाठी लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज आणि आयआयटी मुंबई एकत्र आले असून आयआयटी, मुंबईने चाचणीतील पेटंट मिळवले आहे.

सिकलसेल चाचणी पॉस (पॉइंट ऑफ स्क्रीनिंग) उपकरणे सरकारी आरोग्य केंद्रे, प्रयोगशाळा आणि रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार आणि सामाजिक संस्थां मिळून हे काम करणार असल्याचे सांगण्यात आले. यावर बोलताना आयआयटी मुंबईचे संशोधक डॉ. ओशिन शर्मा यांनी सांगितले की, ’आमचे परवानाकृत एआय सक्षम सिकलसेल चाचणी तंत्रज्ञान भारतभरात सर्वत्र सादर करण्यासाठी लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीजशी सहयोग करण्यात आले असून सिकलसेल पडताळणीच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आमचे तंत्रज्ञान एक गेम चेंजर ठरणार आहे. आयआयटीचे तंत्रज्ञान आणि लॉर्ड्स मार्क एकत्रित आल्याने देशातील सिकलसेल अॅनिमियाने ग्रस्त लाखो रुग्णांच्या जीवनात सुधारणा करण्यावर सकारात्मक परिणाम होईल असे ही डॉ. शर्मा म्हणाले.

भारत सरकारने गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा, बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि तेलंगणा यांसारख्या मध्य आणि दक्षिणी प्रदेशांमध्ये सिकल सेल अॅनिमिया शोधणे आणि उपचार सुधारण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. या उपायांमध्ये नवजात मुलांची तपासणी, राष्ट्रीय निर्मूलन मोहीम, क्लिनिकल चाचण्या आणि विवाहपूर्व समुपदेशन यांचा समावेश आहे. आदिवासी व्यवहार मंत्रालयाने या संबंधाने स्पष्ट दिशानिर्देश दिले आहेत आणि पडताळणीसह रोगाचा सामना करण्यासाठी अनुदान मागणार्या राज्यांना ६० कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. या प्रयत्नांच्या अनुषंगाने, लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज आणि आयआयटी मुंबई यांच्यातील भागीदारी हे भारतातील सिकलसेल रोगाशी लढण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

यावर बोलताना लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीजचे संस्थापक सच्चिदानंद उपाध्याय म्हणाले की, आयआयटी मुंबई सोबतच्या या सहकार्यामुळे लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज ग्रामीण भागात, सिकलसेल चाचणीसाठी प्रभावी उपाय देऊ शकणार आहे. त्यासाठी ५० कोटी रुपयांच्या प्रारंभिक गुंतवणुकीसह देशभरात १,००० पॅथॉलॉजी लॅबच्या स्थापनेतही गुंतवणूक करत आहेत. केंद्र सरकारच्या पाठिंब्याने ही उपकरणे बनवण्याचे व चाचणी सरकारी आरोग्य केंद्रे आणि रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here