महसूल अधिकारी राज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीत व्यस्त
By Milind Mane
Twitter : @manemilind70
महाड: महाडमध्ये दरवर्षी येणाऱ्या पुराच्या पाण्यावर तोडगा काढण्यासाठी महाडमधील सावित्री नदीच्या पात्रात गाळ काढण्याचे काम मागील तीन महिन्यापासून जोमाने सुरू आहे. त्यातच महसूल प्रशासन शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीत व्यस्त असल्याने नदीपात्रातील गाळ काढण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वाळू काढून ती विकण्याचा गोरख धंदा महाडमध्ये जोमाने चालू आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड शहराला दरवर्षी पावसाळ्यात पुराचा सामना करावा लागतो. अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी रात्री अपरात्री महाड शहरात फिरते. परिणामी नागरिकांना कायमस्वरूपी सतर्क राहावे लागते. जुलै 2021 मध्ये आलेल्या महापुरामुळे महाड शहरासहित आजूबाजूला लागून असलेल्या गावांमध्ये सलग तीन दिवस पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता. जुलै 2021 च्या पुरामुळे महाडमध्ये जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली होती. या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने सावित्री नदीमधील गाळ काढून पूर परिस्थितीवर मात करण्याचे ठरविले.
महाड शहराजवळून जाणाऱ्या सावित्री नदीमध्ये शेडाव डोहापासून दादली, केंबुर्ली जवळील नदीपात्रात फेब्रुवारी महिन्यापासून गाळ काढण्याचे काम जोमाने चालू आहे. किमान १०० ट्रक, जेसीबी, पोकलेन यंत्रणेच्या साहाय्याने नदीपात्रातील गाळ काढला जातो आहे. काढलेला गाळ महाड शहराजवळील दादली, केंबुर्ली महाड येथील जलसंपदा विभागाच्या जागेत तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मोकळ्या जागेत व महाड, नवेनगर येथील कोकण म्हाडाच्या जागेत साठवला जात आहे.
सावित्री नदीमध्ये दिवसा गाळ काढण्याचे व रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात रेती काढून ती परस्पर खाजगी विक्रेत्यांना विकण्याचा गोरख धंदा गाळ काढणाऱ्या ठेकेदारांनी अवलंबिला आहे. त्यातच नदीपात्रातील गाळ काढून त्याची वाहतूक करताना ज्या डंपर मध्ये नदीपात्रातील गाळ काढून भरला जातो, त्या डंपरमध्ये चोरीची रेती आहे की नदीपात्रातील गाळ हे विचारणारी यंत्रणा नसल्याने किंबहुना ज्यांना गाळ काढण्याचे काम मिळाले आहे, ती मंडळी सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार व मंत्र्यांच्या जवळची असल्याने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे काम पोलीस यंत्रणे बरोबर महसूल यंत्रणा देखील करीत आहे. मात्र, सामान्य माणसाने घराच्या कामासाठी रेती खडी किंवा डबरची वाहतूक केली तर त्याची गाडी अडवून त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, गाळ काढणाऱ्या व गाळ काढण्याच्या नावाखाली चोरीची रेती वाहतूक करणाऱ्या या चोरांना शासकीय यंत्रणादेखील खुलेआमपणे साथ देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अधिकारी व्यस्त ठेकेदार मस्त?
किल्ले रायगड येथे साजरा होणाऱ्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी महाडमधील तहसील व प्रांत कार्यालयातील अधिकाऱ्यांसहित नायब तहसीलदार मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, विविध ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तसेच पोलीस यंत्रणा या कामात व्यस्त असल्याने त्याचा फायदा गाळ काढणारा या ठेकेदार मंडळींनी घेतला आहे.
सावित्री नदीपात्रातील गाळ काढण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन गाळ काढणारे ठेकेदार करीत आहेत. गाळ काढण्याच्या नावाखाली रात्रीच्या वेळेस रेतीची बेकायदेशीर वाहतूक करणारे जवळपास ५० ट्रक कार्यरत असून या छुप्या रीतीने वाहतुकीस महसूल यंत्रणेसह पोलिस यंत्रणेचा देखील छुपा पाठिंबा असल्याने राजरोस लाखो ब्रास रेतीची बेकायदेशीर विक्री झाली असल्याने महाड महसूल विभागाला करोडो रुपयांचा महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. हा बुडालेला महसूल कसा वसूल होणार असा प्रश्न सामान्य जनता महाड तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांना विचारत आहे.