भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या दुसऱ्या टप्प्यातील अंदाज

यंदा राज्यात सरासरीहून कमीच पावसाची शक्यता

Twitter : @maharashtracity

मुंबई: भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून करण्यात आलेल्या मान्सूनच्या पहिल्या अंदाजानंतर शुक्रवारी मान्सूनचा दुसऱ्या टप्प्यातील अंदाज व्यक्त करण्यात आला. जून महिन्यात राज्यात तापमान वाढीसोबत पावसाची ओढ ही जाणवणार असल्याची मोठी शक्यता वर्तविण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील अंदाजातही राज्यात पावसाची सरासरी कमीच राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र पावसाळ्यात एल निनोचा प्रभाव असला तरी देखील आयओडीमुळे दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच ३० मे पासुन शुक्रवार २ जूनपर्यंत ४ दिवस मुंबईसह संपूर्ण कोकण व उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शुक्रवारी आयएमडीने वर्तवल्याप्रमाणे मान्सून अद्याप अंदमानच्या दक्षिणेकडे जागेवरच असल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील सुधारित अंदाज देतांना वायव्य भारत वगळता देशात सरासरी इतका म्हणजे ९६ ते १०४ धन-ऋण ४ असा पाऊस होण्याच्या शक्यतेचा अंदाज वर्तवला आहे. पावसाळ्यात ’एल-निनो विकसित होण्याच्या दाट शक्यतेसह केवळ आयओडीच्या अस्तित्वामुळे सकारात्मक दिलासाही अंदाजात दिलेला आहे. वायव्य भारतात (जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश व पश्चिम उत्तर प्रदेश ह्या राज्यात) सरासरीपेक्षा कमी पावसाची म्हणजे ९२ टक्के पेक्षाही कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. देशात ९६ ते १०४ टक्के श्रेणीत पडणारा पाऊस हा जरी सरासरी इतका पाऊस मानला जात असला तरी ह्या वर्षी देशात गुणात्मकदृष्ट्या केवळ ९६ धन-ऋण ४ पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे नकारात्मक शक्यतेच्या अंकानुसार ही शक्यता (९६ ते ४) म्हणजे ९२ टक्के येते, कि जी सरासरीपेक्षा कमी (९० ते ९५ टक्के पेक्षा कमी) पावसाच्या श्रेणीत मोडते, हे ही येथे लक्षात घेणे गरजेचे वाटते. येथेही ही नकारात्मकता जाणवते. प्रॉबॅबिलीटीच्या भाषेत देशात सरासरी इतका पावसाचे भाकीत वर्तवतांना सर्वाधिक ’भाकित संभाव्यता‘ ही ४३ टक्के आली आहे. तर सर्वाधिक ’वातावरणीय संभाव्यता’ ही ३३ टक्के आली आहे. बाकी सर्व शक्यता ह्या वरील दोन अंकांच्या खालीच आहे.

राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता ५५ टक्के :

यावर बोलताना भारतीय हवामानशास्त्र विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले की, महाराष्ट्र हा मध्य भारत विभागात मोडतो. मध्य भारतात जरी सरासरी इतका पाऊस वर्तवला असला तरी ’टरसाइल’ श्रेणी प्रकारनुसार सांगली जिल्हा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी पेक्षा कमीच पावसाचीच शक्यता असुन ही सर्वाधिक शक्यता ही ५५ टक्के जाणवत आहे. तर कोकण व सह्याद्रीच्या पूर्वेकडील मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची सर्वाधिक वातावरणीय संभाव्यता ही ३५ टक्के जाणवते. तसेच सांगली जिल्हा व लगतच्या परिसरात मात्र सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. एकंदरीत जून ते सप्टेंबर ह्या ४ महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा  कमी पावसाची शक्यता अधिक जाणवते. महाराष्ट्रात कमी पावसाची शक्यता जरी असली तरी जर पडणाऱ्या पावसाचे योग्य वितरण झाल्यास व उपलब्ध पूर्वपाणीसाठा व वेळेत मान्सूनचे आगमन झाल्यास ह्या आधारे कदाचित शेतपिके हंगाम कदाचित जिंकता येऊ शकतो असेही वाटते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here