प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
Twitter: @maharashtracity
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालय आणि दंत महाविद्यालयातील कामगार कर्मचाऱ्यांचे प्रश्न, मागण्या व अडचणीबाबत म्युनिसिपल मजदूर युनियन मुंबईच्या वतीने वेळोवेळी पत्रव्यवहार प्रत्यक्ष भेटून अधिष्ठाता डॉ. निलम अंद्राडे तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलून निर्णय घेण्यात आले. मात्र घेतलेल्या निर्णयाची अंमजबजावणी करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी २४ एप्रिल ते २ मे या कालावधीत जेवणाच्या वेळेत दुपारी साडेबारा ते १ या कालावधीत मागणी सप्ताह आयोजित करण्यात आला. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्यात आले होते. मात्र त्यावर प्रशासन अंमलबजावणी करत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे १ जून रोजी नैमित्तक रजा घेऊन उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी दिली.
या प्रलंबित मागण्यांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या १३९ पदांपैकी ५१ पदे रिक्त असून ४० टक्के पदे रिक्त असतानाही रुग्णसेवेसाठी चतुर्थश्रेणी कामगारांना अधिष्ठाता कार्यालयात पदाव्यतिरिक्त काम दिले आहे. अशा ७ कामगारांना त्यांच्या पदाचे काम देण्याबाबत आदेश काढले असतानाही प्रशासन दखल घेत नाही. तसेच सफाई कामगारांची २६ पदे असून सर्व पदे भरलेले आहेत. तरीही हॉस्टेलचे काम कंत्राटदाराला देऊन महापिलकेची आर्थिक लूट केली जात आहे. यात कंत्राटादाराला प्रशासन साथ देत असल्याचा आरोप होत आहे. १२ कंत्राटी कामगारांना चतुर्थ श्रेणी कामगारांच्या रिक्त पदांवर काम करण्यासाठी घेतलेले आहे. मात्र त्यांना त्यांच्या पदाचे काम न देता अन्यत्र काम दिले जात आहे. महिला कॉमन रुम आणि बाथरुम सफाईसाठी महिला सफाई कामगार देणे आवश्यक असताना फक्त आठव्या मजल्यावरील कॉमनरुमसाठी महिला कर्मचाऱ्याला देण्यात आली आहे. इतर कामे पुरुष सफाई कर्मचाऱ्यांकडून करुन घेतली जातात. लाड- पागे समितीच्या धोरणाप्रमाणे सफाई कामगारांना काही मुद्यांवर सूट देण्यात आली असतानादेखील सफाई कामगारांना जातीचे प्रमा पत्र विचारले जाते. अशा काही प्रलंबित मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचा निर्णय म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले.