Twitter: @NalavadeAnant
मुंबई
शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर राज्यात याचा फायदा उचलण्यासाठी काँगेस आता पुढे सरसावताना दिसत आहे. राष्ट्रवादीतील फुटी संदर्भात शरद पवारांनी अजित पवार यांच्याबद्दल तळ्यात – मळ्यात भूमिका घेतली असल्याने त्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे महाराष्ट्रात विरोधी पक्षांची मोठी “पॉलिटिकल स्पेस” तयार होत आहे. ही स्पेस पूर्णपणे खेचून घेण्याचा काँग्रेसचा इरादा दिसून येत आहे. त्यामुळेच अमरावतीनंतर आता नगर जिल्ह्यातीलही लोकसभेच्या दोन्ही जागांवर काँग्रेसने आपला दावा ठोकला आहे.
अमरावतीत सध्या नवनीत राणा या अपक्ष खासदार असल्या तरी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केंद्रात पाठिंबा दिला आहे आणि राज्यातही शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा दिलेला आहे. अमरावतीत राणा दांपत्याची लढत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहे. तरीदेखील काँग्रेस तिथे संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न करत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते अशी दोन्ही पदे विदर्भाकडे गेल्याने विदर्भात काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळेच अमरावतीची लोकसभेची जागा काँग्रेसकडे खेचून घेण्याची पक्षाने तयारी सुरू केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी वेगवेगळ्या घराण्यांमध्ये विभागली गेल्याने पक्ष संघटना म्हणून कमकुवत झाली असून ती “पॉलिटिकल स्पेस” भरून काढण्याची संधी आपसूकच काँग्रेसला उपलब्ध झाली आहे. अखंड काँग्रेस असताना नगर शहर आणि एक-दोन मतदारसंघ वगळता शिवसेना-भाजपने तिथे वर्चस्व निर्माण केले नव्हते. पण आता ती परिस्थिती नाही. काँग्रेस – राष्ट्रवादीचे दिग्गज नेते भाजपने स्वतःकडे खेचून घेतले आहेत. खुद्द विखे पाटील हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. पण त्यामुळेच नगर जिल्ह्यात तयार झालेली विरोधी पक्षांची “पॉलिटिकल स्पेस” व्यापण्याची काँग्रेसने तयारी सुरू केल्याचे काही दिवसांच्या त्यांच्या हालचालींवरून दिसून येत आहे.
पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार स्थानिक काँग्रेस संघटना दोन्ही लोकसभा जागांसाठी तयारी करत असल्याची माहिती काँग्रेसचे नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी मागेच बोलून दाखवली आहे. याचा अर्थच काँग्रेस विदर्भाकडून पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेनेही आगेकूच करत आहे. कारण त्यांना राष्ट्रवादीने खाली केलेली विरोधी पक्षांची “पॉलिटिकल स्पेस” व्यापायची आहे.