Twitter : @maharashtracity

मुंबई

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या १२ तासांत १६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. मात्र सार्वजनिक रुग्णालयात मृत्यू होण्याच्या घटना घडतात, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. दरम्यान, राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांनी मात्र या रुग्णालयात तातडीने धाव घेत याबद्दल टीका केली आहे. 

गेल्या बारा तासात १६ मृत्यू झाल्याचे मान्य करत रुग्णालय अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांनी रुग्णांच्या मृत्यूची कारण सांगितली. यात एक चार वर्षांच्या मुलाने जास्त रॉकेल प्यायल्याने तो उपचार सुरु असताना मृत्यू पावला. तर एका रुग्णाच्या डोक्याला मार लागल्याने त्या रुग्णाचा मृत्यू झाला. अन्य एका रुग्णाच्या मेंदूला ट्रॉमा झाल्याने मृत्यू झाला. दोन रुग्णांना फुफ्फुस संसर्ग झाल्याने मृत्यू झाला. इतर तीन-चार रुग्णांना मल्टी ऑर्डर डिस्फंक्शन झालं होतं. यात हृदय विकार असलेला तसेच दुसऱ्या रुग्णांत अति मधूमेह असल्याने वाचू शकले नाहीत. तर काही रुग्ण दीर्घाकाळ उपचार घेत असल्याचे डॉ. राकेश बारोट म्हणाले. येथील बेडच्या तुलनेहून अधिक रूग्ण आम्ही दाखल करून घेत असून डॉक्टर्स २४-२४ तास काम करत आहेत. इथे येणारा रूग्ण गरीब आणि शेवटच्या घटकेला येत असला तरी देखील त्याला उपचाराविना पाठवत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट ) खासदार डॉ अमोल कोल्हे

किती निष्पाप बळी घेणार? : अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या १२ तासांत १६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने राजकीय पक्ष टीका करत आहेत. यावर बोलताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आणखी किती बळी घेणार असा सवाल उपस्थित केला. ते म्हणाले प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक सार्वजनिक दवाखाना होणे गरजेचे असून सरकारी दवाखाने बांधताना भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्येची घनता या निकषाचा विचार केला गेला पाहिजे. त्यासोबतच आतापर्यंत उभारल्या गेलेल्या प्रत्येक सरकारी दवाखान्यात अत्याधुनिक सेवा-सुविधा देणे आवश्यक आहे, तरच आपण खऱ्या अर्थाने आरोग्य व्यवस्थेच्या गलथान कारभारामुळे नाहक जाणारे आपल्या लोकांचे जीव वाचवू शकतो, अशी सूचना कोल्हे यांनी केली.

त्यामुळेच शिरूर लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत बोलत असताना अनेकदा सार्वजनिक आरोग्यावर सरकारचे लक्ष वेधले असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. सरकारची प्राथमिकता सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर जास्तीत जास्त खर्च करून प्रत्येक देशवासियाला उत्तम आरोग्यसेवा देण्याला असली पाहिजे. पण आपण देशाच्या जीडीपीच्या १.५ टक्के इतका खर्चच आरोग्य व्यवस्थेवर करतोय, ही दुर्दैवी बाब आहे. कोविडच्या काळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा पाहिला आहे. म्हणूनच गेल्या ३ वर्षांपासून मी इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पासाठी प्रयत्न करत असल्याचे अमोल कोल्हे म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव

या मृत्यूची जबाबादरी आयुक्तांनी घ्यावी : अविनाश जाधव, मनसे

ठामपाच्या कळवा रुग्णालयात झालेल्या मृत्यूला जबाबदार आयुक्त असून रुग्णाकडे डॉक्टर लक्ष देत नाहीत, म्हणूनच रुग्ण मरत आहेत. हे येथे मरायला सोडलेले आहेत. हे मृत्यूचं तांडव थांबले पाहिजे. नाहीतर ठाण्यात सर्व प्रशासनाला भोगावे लागेल. उद्या आयुक्तांना जाब विचारणार असून या मृत्यूची जबाबादरी आयुक्तांनी घ्यावी, असं मनसेचे अविनाश जाधव म्हणाले. सिव्हील रुग्णालय बंद पडल्याने या रूग्णालयावर भार आला आहे. मात्र पावसाळा असल्याने रुग्ण येणार याचा विचार करून तयारी व्हायला हवी होती. मात्र रुग्णालयाचे हे दरवर्षीचे आहे, ते सुविधा देत नाहीत. कळवा रुग्णालयात रिक्षा-टॅक्सी चालवणारे, भांडी घासणारे येतात. त्यांनाच उपचार देवू शकला नाहीत तर उपयोग काय? असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला.

शरद पवार यांचे ट्विट सहवेदना

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. पवार ट्विटमध्ये म्हणाले आहेत की, १७ जणांचा मृत्यू झाला, ही बाब हृदयद्रावक आहे. काही दिवसापूर्वी याच रुग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाला असतानाही प्रशासनाला जाग आली नाही, हे दुर्दैवी आहे. मृत कुटुंबियांच्या दुखात सहभागी असून सहावेदना व्यक्त करतो असे शरद पवार म्हणाले.

रुग्णालय प्रशासनाचा निषेध – सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विटरवर संतप्त प्रतिक्रिया दिली. हलगर्जीपणा, डॉक्टर-नर्सची कमतरता, अपुऱ्या सोयी-सुविधांना तसेच रुग्णाच्या नातेवाईकांनी दोष दिला असताना रुग्णालय प्रशासनाने मात्र रुग्ण अत्यवस्थ अवस्थेतच दाखल झाले होते, अशी भूमिका घेतली, हे अत्यंत निषेधार्ह आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

रुग्णाच्या जिवाशी होणारी हेळसांड केली जाणार नाहीआरोग्य मंत्री

सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी रुग्णांच्या आरोग्याशी हेळसांड केली जाणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्री सुचवतील तशी कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही सावंत दिली.

सावंत म्हणाले, घटनेची माहिती आम्ही घेत जात असून माहित घेण्यात ठाण्याचे आयुक्त, आरोग्य अधिकारी सहभागी आहेत. हे रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येत असून मृत्यू हा मृत्यूच असतो. हे कशामुळे झाले याचा अहवाल दोन दिवसात येईल. तशी कारवाई केली जाईल. रुग्णाच्या जिवाशी होणारी हेळसांड आम्ही काहीही झालं तरी सहन करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अधिष्ठात्यांना याची कल्पना होती कां? रुग्णांकडे दुर्लक्ष झाल का? अशा अगदी सूक्ष्म बाबीही अहवालात नोंदवली जाणार आहे. ही घटना दुर्दैवी आहे. पुरोगामी महाराष्ट्रात या अशा प्रकारच्या घटना घडणं सर्वसामान्यांच्या आरोग्याची हेळसांड करणं हे माझ्यासारखा मंत्री मुळीच सहन करणार नाही. ज्यावेळी अहवाल येईल त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने योग्य ती कारवाई केली जाईल असे ही सावंत म्हणाले. घटना महाराष्ट्रात घडली असून सगळे महाराष्ट्राचे नागरिक आहेत. त्यांची जबाबदारी ही शासनाची आहे. आम्ही शासन म्हणून जबाबदारी घेतली आहे. या घटनेच्या मुळाशी जात आहोत. ज्या कुणामुळे घडलं असेल त्यावर कारवाई केली जाणारच, असं तानाजी सावंत यांनी जाहीररित्या सांगितले. 

 

मृतांची नावे पुढीलप्रमाणे

१. गीता (अनोळखी)
२. झायदा शेख (६० वर्ष)
३. सुनीता इंदुलकर (७० वर्ष)
४. ताराबाई हरी गगे (५६ वर्ष)
५. भानुमती पाढी (८३ वर्ष)
६. सनदी सबिरा मोहम्मद हुसेन (६६ वर्ष)
७. निनाद रमेश लोकूर (५२ वर्ष)
८. भास्कर भिमराव चाबूस्वार (३३ वर्ष)
९. अमरिन अब्दुल कलाम अन्सारी (३३ वर्ष)
१०. अशोक जयस्वाल (५३ वर्ष)
११. भगवान दामू पोतदार (६५ वर्ष)
१२. अब्दुल रहीम खान (५८ वर्ष)
१३. सुनील तुकाराम पाटील (५५ वर्ष )
१४. ललिताबाई शंकर चव्हाण (४२ वर्ष)
१५. चेतक सुनील गोडे (४ वर्ष)
१६. अशोक बाळकृष्ण निचाल (८१ वर्ष)
१७. नूरजहाँ खान (६० वर्ष)
१८. कल्पना जयराम हुमाने (६५ वर्ष)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here