जुन महिन्याच्या २९ दिवसात शहरात ३९५ तर उपनगरात ५०२.९ मिमी पाऊस

Twitter: @the_news_21

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील जून महिन्यातील सरासरी गाठण्यास २४ ते २९ जून या सहा दिवसांतील झालेला पाऊस पोषक ठरला. भारतीय हवामानशास्त्र मुंबई विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले की, शहर परिसरातील जून महिन्यातील सरासरी ५४२.३ मिमी एवढी असते. यंदा शहरात १ ते २९ जून या कालावधीत ३९५ मिमी एवढा पाऊस झाला. यातील २४ ते २९ जून या सहा दिवसात ३७१.४ मिमी एवढा पाऊस झाला. तर उपनगरातील जून महिन्यातील पावसाची सरासरी ५३७.१ मिमी एवढी असते. १ ते २९ जून या कालावधीत ५०२.९ मिमी एवढा पाऊस झाला. त्यापैकी २४ ते २९ जून दरम्यान ४८५ मिमी एवढा पाऊस झाला. यावरुन जून महिन्याच्या पाऊस सरासरीच्या टप्प्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

ठाणे जिल्ह्यातील धरणांच्या तुलनेत उपनगरातील तलाव क्षेत्रात पाऊस अधिक :

उशिराने दाखल झालेला पाऊस त्यातून पिण्याच्या पाण्याची वाढलेली चिंता अशा द्विधा अवस्थेत असलेल्या मुंबईकरांची अखेर चिंतेतून सुटका झाली. २४ जून पासून सुरु झालेल्या पावसाने ठाण्यातील जलसाठा परिसराच्या तुलनेत उपनगरातील जलसाठा परिसरात विशेष पाऊस झाला. यात विहार आणि तुलसी तलाव क्षेत्रात १५९ ते २६५ मिमी एवढा पाऊस झाला. तर वैतरणा १४४.० मिमी, तानसा १०९ मिमी, अप्पर वैतरणा १२२ मिमी, भातसा १३७ मिमी तसेच मध्य वैतरणा १३७ मिमी असा धरण क्षेत्रात पाऊस झाल्याचे सांगण्यात आले.  

पाऊस नोंद :

गुरुवारी दिवसभरात सायंकाळी ५.३० पर्यंत शहरात १.० मिमी तर सांताक्रुझ येथे ७.८ मिमी एवढा पाऊस नोंदविण्यात आला. तर मनपाच्या स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांवरुन शहरात ६.०१ मिमी, पूर्व उपनगरांत ७.८८ मिमी तर पश्चिम उपनगरात १२.६६ मिमी एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली.

येलो अलर्टचा इशारा :

मुंबई परिसराला आज शुक्रवारसाठी येलो अलर्ट घोषित करण्यात आला असून मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तक्रारी :

शहरात ३, पूर्व उपगरात १ तर पश्चिम उपनगरात ९ अशा एकूण १३ ठिकाणी झाडे किंवा फांद्या पडण्याच्या तक्रारी करण्यात आल्या. तर शॉर्ट सर्किटच्या घटनांमध्ये शहरात ३, पूर्व उपनगरांत १ आणि पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ४ शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. तसेच शहरात एकूण २ ठिकाणी घरावचा काही भाग पडल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. शहरातील वाहतूक मात्र सुरळीत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here