डॉक्टरांच्या एमएमसी प्रमाणपत्रांची होणार चौकशी

Twitter: @the_news_21

मुंबई: मुलुंडमधील मुंबई महानगरपालिकेच्या एम टी अग्रवाल रुग्णालयात आयसीयू चालवण्यासाठी कंत्राटी असलेल्या एका खाजगी कंपनीने पात्र नसलेल्या डॉक्टरांची नियुक्ती केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता व्ही एन देसाई रुग्णालयातही अपात्र डॉक्टर कार्यरत असल्याचे निदर्शनात आले आहे. संबंधित प्रकरणावरुन पालिका आरोग्य अधिकारी सतर्क झाले असून एमएमसी प्रमाणपत्र तसेच इतर चौकशी करुनच डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येत आहे.  

यावर बोलताना पालिकेच्या एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले, अशा ट्रस्ट किंवा फर्मद्वारे नियुक्त केलेल्या प्रत्येक डॉक्टरची नोंदणी करण्याचा आग्रह धरला जात आहे. शिवाय त्यांची तपासणी केली जात आहे. पालिकांच्या रुग्णालयात नेहमीच कर्मचारी, डॉक्टर, टेक्निशियन यांची कमतरता असते. त्यासाठी, खाजगी ट्रस्ट किंवा फर्मशी आयसीयू, एनआयसीयू, डायलिसिस केंद्र इत्यादी सेवा चालवण्यासाठी करार केला जातो. उपनगरात पालिकेची १६ उपनगरीय रुग्णालये आहेत. पंधरा दिवसांपूर्वी मुलुंड पोलिसांनी पालिका संचालित एमटी अग्रवाल रुग्णालयात आयसीयूचे व्यवस्थापन करणाऱ्या खाजगी ट्रस्टशी संलग्न असलेल्या तीन अपात्र आणि बोगस डॉक्टरांना अटक केली होती. त्या तिन्ही डॉक्टरांनी पालिका रुग्णालयात नोकरी मिळवण्यासाठी बोगस प्रमाणपत्रे सादर केल्याचे पोलिसांना आढळले. त्यापैकी दोन जण एमबीबीएसची पदवी न सादर करता डॉक्टर म्हणून काम करत होते. तर तिसऱ्याने चीनमधून एमबीबीएस उत्तीर्ण केल्याचे आढळून आले. मात्र, त्यांची महाराष्ट्रात नोंदणी झालेली नाही. 

व्ही.एन.देसाई रुग्णालयातील आयसीयूचे व्यवस्थापन करणाऱ्या जीवन ज्योत ट्रस्टला अनेक स्मरणपत्रे पाठवून नियुक्त केलेल्या डॉक्टरांच्या नोंदणीचा तपशील रुग्णालयाच्या माजी वैद्यकीय अधीक्षकांनी विचारला होता. १० ऑगस्ट २०२२ रोजीच्या एका पत्रात, रुग्णालयाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने जीवन ज्योत ट्रस्टच्या व्यवस्थापकांना पत्रव्यवहार करुन विचारले होते की, स्मरणपत्रे देऊनही, अपात्र पदवी असलेल्या आणि वैद्यकीय परिषदेची नोंदणी नसलेल्या डॉक्टरांना एम आयसीयू आणि टीआयसीयू (ट्रॉमा आयसीयू) मध्ये काम करण्यासाठी पाठवले जात आहे, जे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे. त्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आणि डॉक्टरकडे एमएमसी नोंदणी नसल्याने मृत्यू प्रमाणपत्रास उशीर झाल्याचे म्हटले आहे.

विविध संस्थांमधून डॉक्टर पुरवले जातात :

आता वेगवेगळ्या संस्थेतून लाईफलाईन, युनिवर्सल डॉक्टर्स पुरवले जातात. आता अलर्ट झाले असून पीपीपी तत्वावर उपनगरातील जवळपास १० ते १२ रुग्णालये चालवली जातात. पोलिसांकडून आता तपास सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here