१०७ ठिकाणी कार्यरत आहेत दवाखाने
Twitter: @maharashtracity
मुंबई: मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ लाभार्थ्यांची संख्या ६ लाखांच्या वर पोहोचली असल्याची माहिती पालिका प्रशासनकडून देण्यात आली. दरम्यान, १ एप्रिल २०२३ पर्यंत आपला दवाखाना लाभार्थी संख्या ६ लाख ०२ हजार ३४८ इतकी झाली आहे.
या दवाखान्यांमधून ५ लाख ७९ हजार १३४ रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार यांचा लाभ घेतला आहे. तर, पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक केंद्र येथे २३ हजार २१४ रुग्णांनी दंतचिकित्सा, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोग तज्ज्ञ अशा उपचार सुविधांचा लाभ घेतला आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १७ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या योजनेचे लोकार्पण करण्यात आले होते. या योजनेचा सातत्याने विस्तार करण्यात येत असून सध्या १०७ ठिकाणी आपला दवाखाने कार्यरत आहेत. ही योजना सुरु झाल्यानंतर सुरुवातीला १ लाख लाभार्थी संख्या ३० नोव्हेंबर २०२२ रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर ७ जानेवारी २०२३ रोजी २ लाख, ३ फेब्रुवारी २०२३ रोजी ३ लाख, २२ फेब्रुवारी २०२३ रोजी ४ लाख, ६ मार्च २०२३ रोजी ५ लाख याप्रमाणे लाभार्थी टप्पा गाठला आहे. तर १ एप्रिल २०२३ सायंकाळी ही संख्या ६ लाखांचा टप्पा गाठून पुढे गेली असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली आहे.
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेद्वारे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार यासह रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त क्ष-किरण (एक्स-रे), सोनोग्राफी इत्यादी चाचण्यांकरिता पॅनलवरील डायग्नोस्टिक केंद्रांद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्याचबरोबर विशेष तज्ज्ञांच्या सेवा देखील पॉली क्लिनिक व डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करुन दिली जात आहे.
या दवाखान्यांमधून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व टॅब आधारित पद्धतीने सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा व वितरण तसेच संदर्भित केलेल्या निदान सुविधा यांचा तपशिल नोंदविण्यात येत आहे. यामुळे आपल्या दवाखान्यांचे कामकाज हे विनाकागद अर्थात पेपरलेस पद्धतीने व पर्यायाने पर्यावरणपूरक होत आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.