@maharashtracity

ग्राहक विना मास्क आढळून आल्यास त्याला फक्त ५०० रुपये दंड

मुंबई: एखादा ग्राहक (consumer) दुकानात विना मास्क (No Mask) आढळून आल्यास त्या ग्राहकाला फक्त ५०० रुपये दंड तर संबंधित दुकान अथवा आस्थापनेला (shopkeeper) १० हजार रुपये इतका दंड आकारण्यास भाजप (BJP) व्यापारी सेलतर्फे भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

ग्राहकाने मास्क न घातल्यास, दुकानदारांना दहा हजारांचा दंड करणे हे म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्यासारखे संतापजनक आहे, असे आ. मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने दुकानदारांवर लादलेला हा तुघलकी व अन्यायकारक निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी भाजप व्यापारी सेलतर्फे करण्यात आली आहे. या निर्णयाबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी ग्वाही अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी यावेळी दिल्याचे आ. लोढा यांनी सांगितले.

यावेळी स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट (Bhalchandra Shirsat), अजय पाटील, मुंबई भाजपा व्यापारी सेलचे अध्यक्ष जयेश जरीवाला, जयेश जोशी, अल्पेश शहा, प्रदीप शर्मा, सवेश प्रतापसिंह आदी उपस्थित होते.

भाजपचे मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखालील व्यापारी सेलच्या व्यापारी शिष्टमंडळाने सोमवारी पालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांची भेट घेऊन त्यांना लिखित निवेदन दिले आहे.

कोविडचा प्रादुर्भाव (covid pandemic) असताना प्रत्येकाने मास्क घालणे ही त्यांची व्यक्तिगत जबाबदारी आहे. असे असताना ग्राहकाने मास्क घातला नसल्याच्या कारणाखाली संबंधित दुकानदारांना १० हजार रुपये दंड आकारण्याचा राज्य सरकारचा हा निर्णय अन्यायकारक आहे. या अविचारी निर्णयामुळे अगोदरच कोविडच्या फटक्याने कंबरडे मोडलेल्या दुकानदारांना आणखीन मोठा आर्थिक फटका बसणार आहे,

तसेच, कोविड नियमांच्या नावाखाली भ्रष्टाचाराचे (corruption) नवे कुरण निर्माण होईल, अशी भीती आ. लोढा यांनी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे छोट्या दुकानदारांना त्यांची दुकाने बंद करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. कारण दंडाची रक्कम दुकानदाराच्या कमाईपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या नियमांत सुधारणा करून दुकानदारांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा आ. लोढा यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here