समुद्र भरती, अतिवृष्टीबाबत तीन तास अगोदरच ‘अलर्ट’ मेसेज
नौदलाची ५ पथके, एनडीआरएफची ३ पथके, लष्कराचे ५०० अधिकारी, जवान तैनात
६ समुद्र किनाऱ्यांवर जीवरक्षक, अग्निशमन दलाचे अधिकारी, जवान, पोलीस पेट्रोलिंग
६ रेस्क्यू बोट्स, १२ कयाक, ४ हॉटलाईन्स, २४ विभागात नियंत्रण कक्ष
@maharashtracity
मुंबई: यंदाचा पाऊस कारवारपर्यंत दाखल झाला आहे. येत्या ३ – ४ दिवसातच हा पाऊस मुंबईत दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मुंबईत यंदा १०३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र मुंबईत येत्या पावसाळ्यात पूरस्थिती (flood like situation) निर्माण होऊ नये यासाठी मुंबई महापालिका यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे.
पावसाळ्यात समुद्रात मोठी भरती (high tide) असेल व अतिवृष्टी (heavy rain) होणार असेल तर त्याबाबत नागरिकांना मोबाईल अँपवर तीन तास अगोदरच ‘अलर्ट’ मेसेज मिळणार आहे.
दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वी आवश्यक नालेसफाईची कामे करण्यात आली आहेत. पावसाळ्यात व पावसाळ्यानंतरही नालेसफाईची Nullah Safai) कामे करण्यात येणार आहेत. यंदा पावसाळ्यापूर्वी १०५ टक्के नालेसफाई कामे करण्यात आली आहेत, असा दावा अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी केला आहे.
मुंबईत दरवर्षी २,००० ते २,२०० मिमी इतका पाऊस पडतो. अतिवृष्टी झाल्यास व त्याच वेळी समुद्रात मोठी भरती असल्यास मुंबईत सखल भागात पाणी साचते. मात्र पालिकेने यावेळी पावसाळ्याला तोंड देण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज ठेवत विविध उपाययोजना केल्या असल्याचा दावा अतिरिक्त आयुक्तांनी केला आहे.
मोबाईल अँपवर ‘अलर्ट मेसेज’
मुंबईत अतिवृष्टीमुळे मिठी नदीला पूर आल्यास, पूरस्थिती उद्भवल्यास, वादळी वारे आदींबाबतची माहिती नागरिकांना डिझास्टर मॅनेजमेंट बीएमसी मोबाईल ‘अँप’वर दिली जाणार आहे. तीन तासांपूर्वी हवामान खात्याकडून प्राप्त होणारी पावसासंबंधीची माहिती, त्यासाठी पालिकेने केलेली तयारी याबाबत आणि वादळ येणार असल्यास एक दिवस आधी ही माहिती लोकांना डिझास्टर मॅनेजमेंट बीएमसी मोबाईल ‘अँप’ वर दिली जाणार आहे
२२ दिवस समुद्रात मोठी भरती
यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या पावसाळ्यात समुद्रात २२ दिवस मोठी भरती असणार आहे. त्यामुळे समुद्रात साडेचार फुटांपेक्षाही जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. याच कालावधीत अतिवृष्टी झाल्यास मुंबईत पाणी साचते व त्याचा जनजीवनावर कमी – अधिक प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळे या २२ दिवसात गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा, माहिम आदी समुद्र चौपट्यांच्या ठिकाणी पालिकेतर्फे ९४ जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. पोलिसांकडून पेट्रोलिंग करण्यात येणार आहे.
तसेच, ६ रेस्क्यू बोट्स, १२ कयाक, ४२ लाईफ जॅकेट्स, ४२ इनफ्लेटेबल जॅकेट्स, १० रिंग बुआईज उपलब्ध ठेवण्यात आले आहेत.
नौदल, एनडीआरएफ, लष्कराची पथके व अग्निशमन दल सज्ज
यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण झाल्यास मुंबईकरांच्या मदतीसाठी कुलाबा, वरळी, मालाड, मानखुर्द व घाटकोपर या ठिकाणी नौदलाची ५ पूर बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत.
पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास मदतीसाठी ‘एनडीआरएफ’ची ३ पथके अंधेरी, क्रीडा संकुल येथे तैनात ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे, लष्कराचे ५ अधिकारी व सैनिक हे सज्ज ठेवण्यात आले आहेत. तसेच, २० जीवरक्षक तराफे तैनात करण्यात आले आहेत.
पावसाळ्यापूर्वी रंगीत तालीम व धोकादायक ठिकाणी रेकी
पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांत २ रंगीत तालमींचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, पूर स्थिती उद्भवणाऱ्या नद्यांच्या ठिकाणी, दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या डोंगर, दरडीच्या ठिकाणी आणि मोडकळीस आलेल्या, धोकादायक स्थितीतील इमारतींच्या ठिकाणी नौदल, लष्कर, एनडीआरएफ ची पथके व अग्निशमन दल भेटी देऊन ‘रेकी’ करणार आहेत. तसेच, कुर्ला, घाटकोपर व भांडुप या विभागात दरड कोसळण्याच्या ठिकाणी एनडीआरएफच्या दोन पथकांची विभागणी तीन पथकात करून त्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.
पालिकेची डिजिटल यंत्रणा
अतिमहत्वाच्या ६१ ठिकाणांसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनांमध्ये अत्याधुनिक डिजिटल मोबाईल रेडिओ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. पालिकेची २४ प्रशासकीय कार्यालये, ६ मोठी रुग्णालये, २८ बाह्य यंत्रणांना जोडणाऱ्या ५८ हॉटलाईन्स कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मुंबईत पालिका व पोलीस यंत्रणेमार्फत ५,३६१ ठिकाणी सीसी कॅमेरे बसविण्यात आले असून त्यांचे थेट प्रक्षेपण पालिका मुख्यालयातील आपत्कालीन कक्षात पाहता येते.
आपत्कालीन परिस्थितीत मोबाईल फोन नेटवर्क यंत्रणा फेल झाल्यास संपर्कासाठी हॅम रेडिओ यंत्रणा उपलब्ध करण्यात आलेली आहे. नागरिकांना आपत्कालीन मदतीसाठी १९१६ क्रमांकाच्या ६० लाईन्स हंटिंग सुविधेसह उपलब्ध आहे. तसेच , आणीबाणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
मुंबईतील नद्या व तलाव या ठिकाणी पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास त्याची माहिती ‘ रडार लेव्हल ट्रान्समिटर’ प्रस्थापित करण्यात आले आहे.
पूरस्थितीचा फटका बसल्यास पर्यायी उपाययोजना
मुंबईत अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्यास नदी, मोठे नाले परिसरात राहणाऱ्या नागरिकांना तात्काळ नजीकच्या पालिकेच्या प्रत्येक विभागात ५ शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. तेथे त्यांच्यासाठी सामाजिक संस्थांच्या मार्फत राहण्याची, अन्न, पाणी आदींची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
मोठ्या पंपिंग स्टेशनसह ४७७ ठिकाणी पंपची व्यवस्था
मुंबई महापालिकेने पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास हिंदमाता, गांधी मार्केट, परळ, सायन, भांडुप, कुर्ला, घाटकोपर आदी सखल भागात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी हिंदमाता, हाजीयाली, लव्हग्रोव्ह, क्लिव्हलँड, ब्रिटानिया, इर्ला व गझधरबंध या मोठ्या क्षमतेच्या पंपिंग स्टेशनसह ४७७ ठिकाणी पंपांची अधिकची व्यवस्था केली आहे.