@maharashtracity
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेविकांनी (BMC helath workers) आझाद मैदानात काही मागण्या करत आंदोलन सुरु केले होते. त्याची दखल घेत पालिकेच्या आरोग्य सेविकांच्या वेतनात तीन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मात्र, १ जून २०२२ पासून दोन हजार रुपये वाढ तर १ एप्रिल २०२३ एक हजार वाढ देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना अध्यक्ष अॅड. पकाश देवदास यांनी दिली. मात्र हे सर्व लिखित स्वरुपात मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, आरोग्य सेविकांना वेंडर म्हणून नेमण्यात आल्यापासून त्यांचे इन्कम टॅक्स कापले जात होते. हे इन्कम टॅक्स आता कापले जाणार नाही. तसेच उर्वरित मागण्या एका महिन्यात पूर्ण केल्या जातील, असेही ऍड. प्रकाश देवदास यांनी सांगितले. पालिकेच्या आरोग्य सेविकांचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू होते.
मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तीन हजार रुपये वाढवून देण्याचे मान्य केले आहे. मात्र, आरोग्य सेविका पेन्शनबाबत ठाम असल्याचे सांगण्यात आले. तसेच पालिकेच्या आरोग्य सेविकांचे वेतन ८१०० रुपये ऐवजी जून २०२२ पासून ११,००० एवढे मिळणार आहे. तर १ एप्रिल २०२३ पासून यात १ हजार रुपयाची वाढ करुन बारा हजार रुपये वेतन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, वेतनातून टॅक्स कापला जाणार नाही. उर्वरित मागण्यांवर एका महिन्यात निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.