देशातील पहिलाच प्रकल्प

मुंबई: मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील क्षयरोग संसर्गास प्रतिबंधासाठी तसेच क्षयरोग बाधितांना प्रभावी औषधोपचार मिळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून के.ई.एम. रुग्णालयात व्होल जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.

या पथदर्शी प्रकल्पामुळे औषधांना न जुमानणाऱ्या क्षयरोगाची (TB) बाधा झालेल्या रुग्णांना क्षयरोगावर मात करण्यासाठी कोणती औषधे द्यावीत, याचा निर्णय घेणे डॉक्टरांना अधिक सुलभ होणार आहे. यातून वेळच्यावेळी व अचूक औषधोपचार मिळाल्यामुळे रुग्ण लवकर बरा होण्यास मोलाची मदत होईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

देशातील पहिलाच प्रकल्प

दरम्यान, व्होल जिनोम सिक्वेन्सिंग (Whole Genome Sequencing) प्रकल्प सार्वजनिक आरोग्य खाते आणि सोसायटी फॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू एंटरप्रेन्योरशिप (SMILE) कॉन्सिल या महानगरपालिकेच्या (BMC) अखत्यारितील संस्थांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. तसेच स्माईलच्या अंतर्गत नवउद्यमी असणाऱ्या व बिझनेस इनक्युबेशन सेंटरचा (Business Incubation Centre) भाग असणाऱ्या मे. हेस्टॅक अ‍ॅनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअप संस्थेच्या तंत्रज्ञानाची जोड आहे. या प्रकारचा प्रकल्प यापूर्वी ब्रिटन देशात राबविण्यात आला होता. त्यानंतर तो थेट मुंबईत राबविण्यात येत आहे. ही बाब लक्षात घेता हा प्रकल्प जगभरातील दुसरा, तर देशातील पहिलाच प्रकल्प असणार असल्याचे महानगरपालिकेच्या व्यवसाय विभागाच्या प्रमुख शशी बाला यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, मुंबईसारख्या अत्याधुनिक महानगरातही वर्षाला क्षयरोगाचे ६० ते ६५ हजार रुग्ण आढळून येतात. दरवर्षी मुंबईत अंदाजे २८०० ते ३००० क्षयरोगाने मृत्यमुखी पडतात (निक्षय प्रणालीनुसार). या क्षयरोगाला प्रतिबंध व्हावा, यासाठी मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्वस्तरिय उपाययोजना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करित असते. याच उपाययोजनांच्या शृंखलेमध्ये आता अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘व्होल जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प’ कार्यान्वित झाल्याने संबंधित रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (क्षयरोग नियंत्रण विभाग) डॉ. वर्षा पुरी यांनी सांगितले की, क्षयरोगासाठी योग्य असे औषधोपचार उपलब्ध असून देखील त्यावर नियंत्रण मिळवणे, हे विविध कारणांमुळे एक आव्हान ठरत आहे. त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे एका किंवा अनेक औषधांना प्रतिसाद न देणारे क्षयरोगाचे जिवाणू निर्माण होत आहेत. त्यापैकी ‘मल्टी ड्रग रेसिस्टन्ट टीबी’ (MDR-TB) आणि ‘एक्सटेन्सिव्हली ड्रग रेसिस्टन्ट टीबी’ (XDR-TB) हे क्षयरोगाचे दोन्ही प्रकार सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने घातक प्रकार आहेत. अशा प्रकारच्या क्षयरोगाचा प्रसार होण्याचे मुख्य कारण म्हणजे या प्रकारच्या क्षयरोगाचे निदान होण्यास अधिक वेळ लागणे; परिणामी, योग्य ते उपचार होण्यास देखील विलंब होणे. ही बाब टाळण्यासाठी ‘WGS’ उपयुक्त ठरणार आहे असे डॉ.पुरी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here