Twitter: @maharashtracity
मुंबई: राज्यात रविवारी ३९७ एवढी कोरोना रुग्ण संख्या होती. तर सोमवारी हीच नोंद २०५ एवढी करण्यात आली. २४ तासात बऱ्याच संख्येने घट दिसून आली असली तरी सरकारी रुग्णालयांपासून खासगी रुग्णालयांमध्ये कोविड विशेष वॉर्ड सुरु करण्याची लगबग दिसून आली. नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यातील कोरोना तसेच आरोग्य स्थिती याबाबतची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सभागृहाला दिली. कोविड टास्क फोर्सच्या तज्ज्ञांकडून देखील सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, राज्य सरकारी रुग्णालये, मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये तसेच खासगी रुग्णालये देखील कोविड समर्पित वॉर्ड सज्ज असल्याचे चित्र मुंबईत आहे. सेव्हन हिल्स रुग्णालयात रुग्ण दाखल होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी ३० कोविड रुग्ण दाखल असून यातील ५ जण आयसीयू विभागात असल्याचे येथील डॉ. महारुद्र कुंभार यांनी सांगितले. रुग्ण संख्या वाढत राहिल्यास कोरोना वॉर्ड सज्ज असल्याचेही ते म्हणाले.
त्याचवेळी पालिकेच्या कस्तुरबा रुग्णलयातही कोरोना रुग्ण दाखल होण्यास सुरुवात झाली असल्याचे सांगण्यात आले. तर राज्य सरकारचे कोविड समर्पित सेंट जॉर्ज रुग्णालय सज्ज असून औषधे आणि आयत्यावेळी लागणारा ऑक्सिजनचा साठा करुन ठेवला असल्याचे जे जे रुग्णालय समुहाच्या डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.
सरकारी रुग्णालयांसह मुंबईतील प्रमुख खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा कोविड समर्पित वॉर्ड सुरु करण्यात आले आहेत. यावर लिलावती हॉस्पीटलचे डॉ. व्ही रविशंकर यांनी सांगितले की, कोविड रुग्णांसाठी आयसीयूमध्ये १५ बेड्स असून कर्मचाऱ्यांना कोविड प्रोटोकॉल पाळण्याच्या सुचना दिल्या आहेत. तर बॉम्बे हॉस्पीटलचे डॉ. गौतम भन्साळी यांनी देखील याला दुजोरा देत त्यांच्या रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी १० खाटा ठेवण्यात आल्याचे सांगितले.
तसेच रुग्ण संख्या वाढत असली तरी रुग्णांचे दाखल होण्याचे प्रमाण कमी असल्याचे डॉ. भन्साळी म्हणाले. ७२ वर्षाची एक महिला रुग्ण दाखल होण्याच्या तयारीत आली होती. मात्र, त्यांना आम्ही घरच्या घरीच उपचार देत आहेत असे डॉ. भन्साळी म्हणाले. तर हिरानंदानी हॉस्पीटलचे सीईओ डॉ. सुजित चॅटजी यांनी दररोज एक दोन रुग्ण दाखल होत असून यात अत्यावस्थेत कोणताही रुग्ण आढळला नसल्याचे सांगितले.