वर्षभरात १८०० रुग्णांना तपासणी व उपचाराचा दिलासा

Twitter: @maharashtracity

मुंबई: कीमोथेरपी नंतर होणाऱ्या दुष्परिणांवर तातडीने उपचार मिळावेत यासाठी टाटा रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या टाटा किमोथेरपी युनिटचा लाभ १८०० रुग्णांनी घेतला. विशेष म्हणजे गंभीर झालेल्या २० जणांना तातडीने उपचार मिळाल्याने त्यांना जीवदान मिळाले असल्याचे सांगण्यात आले.  

दरम्यान, जगभरात कर्करुग्ण वाढत असल्याने किमोथेरपी घेणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. वैद्यकीय ऑन्कोलॉजी विभागाच्या ओपीडीमध्ये सुमारे ४,५०,००० रुग्ण उपचार घेत असतात. तसेच हजारो रुग्णांवर किमोथेरपीद्वारे उपचार केले जातात. मात्र, किमोथेरपी नंतरच्या काळजीची रुग्णांना बरीच गरज असते. केमोथेरपी संबंधित दुष्परिणाम झालेल्या रुग्णांना काय करावे हे माहित नसल्याने ते घरीच राहतात. यातून त्यांच्यात विकृती अथवा मृत्यूचे प्रमाण वाढू शकते. 

या गोष्टीचा रुग्णाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. किमोथेरपी घेत असलेल्या रूग्णांची काळजी घेण्यात किमो केअर परिचारिका महत्वाची भूमिका बजावतात. रुग्णाला उपचार दिल्यानंतर त्यांच्याशी सतत संपर्क ठेवणे किंवा रुग्णाला डॉक्टरांशी संपर्क ठेवणे शक्य नसते. ही बाब लक्षात घेत टाटा मेमोरियल रुग्णालयातील मेडिकल ऑन्कोलॉजी विभागाने ’केमो केअर युनिट‘ची संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला. 

या प्रकल्पाची सुरुवात ऑगस्ट २०२२ मध्ये १० परिचारिकांच्या निवडीसह झाली. निवडकांना वर्ग खोलीतील अनुभवासोबतच किमोथेरपी संबंधित दुष्परिणामांचे व्यवस्थापन करण्यासाठी दोन महिने प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर परिचारिकांना तीन शिफ्टमध्ये ठेवण्यात आले आहे. ज्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांशी २४ तास संपर्क साधता येतो. यात रुग्णाचा फोन आल्यावर या परिचारिका रुग्णाशी संवाद साधातात. त्यांना आजाराच्या नेमक्या काय अडचणी आहेत ते समजून घेतात. त्यानंतर उपचार केलेल्या डॉक्टरांच्या युनिटशी चर्चा करून रुग्णाला दिलेल्या उपचाराची माहिती घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना योग्य मार्गदर्शन करतात. त्यानुसार रुग्णाच्या आजाराबाबतच्या तक्रारी किती सौम्य आहेत त्यानुसार परिचारिका रुग्णांना औषधे घेण्याचा सल्ला देतात. तक्रारी गंभीर स्वरूपाच्या असतील तर रुग्णांना एकतर जवळच्या क्लिनिकला भेट देण्याचा किंवा टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन विभागाला भेट देण्याचा सल्ला दिला जातो.

या प्रकल्पावर बोलताना डॉ. विकास ओसवाल यांनी सांगितले की, आतापर्यंत १८०० हून अधिक रुग्णांच्या किमोथेरपीनंतरच्या अडचणी दूर केल्या असून त्वरीत झालेल्या उपचारामुळे त्यांचा जीव वाचला आहे. सध्या पहिल्या टप्प्यात स्वालीड ट्युमरवर हा प्रयोग केला. दुसऱ्या टप्प्यात ब्लड कँसर आणि लहान मुलांच्या कँसरसाठी ही पद्धती वापरणार असल्याचे डॉ. ओसवाल यांनी स्पष्ट केले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here