By Anant Nalawade

Twitter: @nalawadeanant

मुंबई: न्यायालयाच्या ज्या निर्णयानुसार काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली, त्याच लोकप्रतिनिधी कायद्याचा आधार घेऊन राज्यातील एकनाथ शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांना अलिबाग कोर्टाने दोन वर्षाची सजा सुनावली असतानाही आमदारकी का रद्द करण्यात येत नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द केल्यानंतर आता त्यांच्या रद्द करण्यात आलेल्या खासदारकीबाबत सुप्रीम कोर्टात उद्यापासून सुनावणी होणार आहे, अशी माहिती तपासे यांनी दिली.

बिल्कीस बानो यांच्यावरील बलात्कारातील आरोपी गुजरात सरकारच्या शासकीय कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित राहतो हे दुर्दैवी असून या घटनेचाही निषेध करतो असे सांगून महेश तपासे म्हणाले की, आपण कायद्यावर विश्वास ठेवून असतो आणि दुसरीकडे सरकारकडून अपेक्षा असते की अशा व्यक्तींना सार्वजनिक जीवनात जवळ करता कामा नये. परंतु, गुजरात सरकारमध्ये राजकारण सुरू आहे. एवढी संवेदनशीलता गुजरात सरकारने दाखवायला हवी होती. मात्र, ती दाखवली नाही याबद्दलही तपासे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

चेंबूर येथे बुधवारी २९ मार्च २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजता मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने होणार्‍या ‘युवा मंथन, वेध भविष्याचा’ या शिबिराला पक्षाध्यक्ष खा. शरद पवार उपस्थित राहणार आहेत. मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या कार्यक्रमात आगामी मुंबई मनपा निवडणुकीबाबत पवार हेच मार्गदर्शन करतील. युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या पवार यांना ऐकण्यासाठी हजारो युवक उपस्थित राहतील, असेही तपासे यांनी सांगितले.

छत्रपती संभाजी नगर येथे २ एप्रिल रोजी महाविकास आघाडीची जाहीर सभा होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी ती यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत व सभेला राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती असेल, असा विश्वास तपासे यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राखी जाधव, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here