काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची घणाघाती टीका

By Anant Nalawade

Twitter : @nalawadeanant

मुंबई: राज्यात भाजपाप्रणित सरकार आल्यापासून जनतेच्या पैशाची लूट सुरु आहे. मागील ९-१० महिन्यात शिंदे फडणवीस सरकारने तिजोरी लुटण्याचे काम केले आहे. जी-२० परिषदेच्या बैठकांवर वारेमाप पैशांची उधळपट्टी करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे. पण शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही. दिल्लीत अदानींच्या रूपाने तर राज्यात अजय आशरच्या रुपाने सरकारी तिजोरी लुटण्यासाठी बसवले आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पटोले पुढे म्हणाले की,भाजपच्याच आमदाराने अजय आशरला लुटारु म्हटले होते. त्याच अजय आशरला शिंदे फडणवीस सरकारने तिजोरीवर बसवले आहे. अजय आशरवर या सरकारला आता एवढे प्रेम का? यासंदर्भात प्रश्न विचारले असता सरकार त्यावर गप्प बसते. अनेक प्रश्नाला या सरकारने उत्तरेच दिली नाहीत. त्यांना सोईची वाटतील तीच उत्तरे देण्यात आली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही, तरुणांच्या समस्यांवर उत्तरे दिली नाहीत. आतातर नोकरीसाठी आऊटसोर्सिंग करण्याचा निर्णय घेऊन तरुणवर्गाला मोठ्या अंधारात ढकलण्याचे काम केले आहे. या सरकारचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणतात शेतकरी आत्महत्या तर रोजच होत असतात, इतके असंवेदनशील सरकार कधी इतिहासात झाले नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही जनतेचे प्रश्न मांडले पण हे सरकार मात्र ‘हम करेसो कायदा’, या पद्धतीने वागले. या सरकारने लोकशाही मुल्य जोपासली नाहीत, असा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला.

मी २५ वर्ष या सभागृहात आहे. पण असे सरकार पाहिले नाही. जनतेच्या प्रश्नावर भुलथापा देण्याचे काम या सरकारने केले आहे. राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारणाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित होते, पण त्यांनी कारवाई केली नाही. सरकारच्या कामाच्या पद्धतीचा निषेध करत आम्ही आज दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. विरोधी पक्षांची मुस्कटदाबी करण्याचे काम सरकारने केले आहे, पण लोकशाहीत जनता मोठी असते आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ, असा इशाराही पटोले यांनी यावेळी बोलताना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here