मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

By Anant Nalawade

Twitter : @nalawadeanant

मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पातून मांडलेले विकासाचं पंचामृत राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करु. समाजातील सर्व घटकांना न्याय देतानाच सर्वांगीण विकासाचे ध्येय बाळगून राज्याला गती देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत शनिवारी अंतिम आठवडा प्रस्ताव व नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना दिली.

मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले की, सर्वसामान्यांचे सरकार स्थापन होऊन नऊ महिने पूर्ण झाले आहे. पूर्ण काळ अधिवेशन घेऊन विक्रमी कामकाज केले असून या माध्यमातून व संवादातूनच जनतेचे प्रश्न सुटू शकतात. लोकशाहीत चर्चा, संवादाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सुटू शकतात. पंचामृताच्या योजनांतून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे.

सर्वसमावेशक विकासाची संकल्पना

सर्वसमावेशक विकासाची संकल्पना घेऊन काम करीत असलेल्या या सरकारने पायाभूत सुविधा, कृषि, आरोग्य, सामाजिक न्याय, महिला, आदिवासी विकास, शिक्षण अशा विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद केली असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आमची विकासाची संकल्पना, प्रगतीचा विचार हा सर्वसमावेशक असून आमचे सरकार महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करणारे आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील १२ कोटींपेक्षा अधिक जनता आशावादी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

बळीराजाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे

राज्यातील बळीराजावर संकट आले असून बळीराजाच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे आहे. अडचणीच्या काळात मदतीसाठी मागेपुढे बघणारे आम्ही नाही. त्यामुळेच कांदा उत्पादकांपासून अवकाळीग्रस्तांपर्यंत सगळ्यांना या सरकारवर विश्वास आहे. सरकार त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

डबल इंजिनमुळे विकासाचा वेग वाढला

लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे सरकार अशी ओळख धडाकेबाज निर्णयांमुळेच मिळाली आहे, डबल इंजिनमुळे या राज्यात विकासाचा वेग वाढला आहे. विकासाची बुलेट ट्रेन सुसाट निघाली असून आहे. केंद्राने महाराष्ट्रासाठी विविध योजनांसाठी निधी देखील मोठ्या प्रमाणावर दिला आहे. सुमारे ३२ हजार ७८० कोटी केंद्र शासनाने महाराष्ट्राला दिले आहे. मुंबईतला एमटीएचएल प्रकल्प असो, किंवा कोस्टल रोड, मेट्रोची कामं, रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण अशा विविध पायाभूत सुविधांच्या कामांनी वेग पकडला आहे. मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन वर्षाअखेरीस होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्ग अधिक सुरक्षित करण्याचे नियोजन

भारतासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती दिली असून बीकेसीमध्ये जागा उपलब्ध करून दिली आहे. भारतातील या सर्वात पहिल्या बुलेट ट्रेनची सुरुवातही करू. मुंबई – नागपूर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महाराष्ट्र महामार्ग अधिक सुरक्षित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईचं महत्त्व कमी होणार नाही

गेल्या काही वर्षात मुंबईचा रखडलेला विकास आणि खड्ड्यांची मुंबई ही ओळख पुसून मुंबईचे गतवैभव पुन्हा मिळवून द्यायचे आहे. बाहेर गेलेला मुंबईकर परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि यापुढेही राहील. मुंबईचं महत्त्व कमी होणार नाही. आम्ही ते कमी होऊ देणार नाही, असे सांगत वर्षानुवर्षे रखडलेला पुनर्विकासाचा मार्गही मोकळा केल्यामुळे सेस बिल्डिंगमधील रहिवाशांना आता चांगली आणि हक्काची घरं मिळणार आहेत. मुंबईचे भूमिपुत्र असलेल्या कोळी बांधवांनाही त्यांचे कोळीवाडे आणि स्वतंत्र गावठाण यांचे सर्वेक्षण आणि सीमांकन करून हक्काची घरं मिळतील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई, मुंबई महानगर परिसरात मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती

मुंबई सारख्या महानगरामध्ये दळणवळणानंतर घरांचा विषयही जिव्हाळ्याचा आहे. आमचं सरकार आल्यानंतर केवळ मुंबईच नाही तर मुंबई महानगर क्षेत्रात देखील सिडको, म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती करतो आहोत, असे सांगून आजच्या पिढीला, तरुणांना काम करणारे सरकार हवे आहे, आणि आम्ही ‘परफॉर्म’ करीत आहोत. लोकांच्या मनातलं हे सरकार सर्वसामान्य लोकांसाठी अशीच दमदारपणे वाटचाल करीत राहील अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here