मुंबईत पूर अलर्ट देणारी आयफ्लोज प्रणाली यंदाच्या पावसाळ्यासाठी कार्यरत

Twitter : @maharashtracity

मुंबई: यंदाच्या पावसाळ्यासाठी मुंबईतील नागरिकांच्या सुविधेसाठी आयफ्लोज (IFLOWS) प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.  बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग आणि राष्ट्रीय समुद्रीतट संशोधन केंद्र यांच्यामार्फत संयुक्तरित्या पूर प्रवण क्षेत्राची आगाऊ सूचना देणारी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यासोबतच नागरिकांच्या मदतीसाठी आपत्कालीन कक्षासोबत संपर्क साधण्यासाठीच्या हॉटलाईन्स, आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरता निवारा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक आणि मोबाईल एप यासारख्या सुविधाही नागरिकांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून उपलब्ध देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच २४ प्रशासकिय कार्यालयांमध्ये ‘विभागीय नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित करण्यात आली आहे. ‘मान्सुन – २०२३’ सुसज्जतेबाबत बृहन्मुंबई महानगरपलिकेद्वारे सर्वस्तरिय कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने यंदाच्या पावसाळ्यासाठी विविध यंत्रणांसोबत सुसज्जतेसाठी समन्वय साधला आहे.  

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशांनुसार महानगरपालिकेच्या मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या धर्तीवर सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये विभागीय नियंत्रण कक्ष प्रथमच स्वतंत्र मनुष्यबळासह सुसज्ज करण्यात आले आहेत. त्यासोबतच ५८ हॉट लाईन्सची सुविधा ही महानगरपालिकेची २४ प्रशासकीय विभाग कार्यालये, ६ मोठी रुग्णालये व २८ बाह्य यंत्रणांना जोडण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे.  मुंबई पोलीसांमार्फत बृहन्मुंबईत बसविण्यात आलेल्या ५३६१ सिसिटीव्ही कॅमे-यांचे थेट प्रक्षेपण पहाण्याकरिता व्हिडीओ वॉलची सुविधा आपत्कालीन कक्षात उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच आपत्ती प्रसंगी वाहतूक व्यवस्था कोलमडल्यास विविध रेल्वे स्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवाशांकरिता, तसेच आपत्तीमुळे बेघर झालेल्या नागरिकांकरिता तात्पुरते आश्रय मिळावा म्हणून निवाऱ्याची व्यवस्था करण्याच्या सूचना सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांनी दिल्या आहेत.  

बृहन्मुंबई महापलिकेद्वारे ‘मान्सुन-२०२३’ च्या अनुषंगाने सर्वस्तरीय कार्यवाही करण्यात आली असून याबाबतचे ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेतः

मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्षामधील संदेशवहन व समन्वय
• वर्षाचे ३६५ दिवस २४ तास कार्यरत: महापालिकेचा मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष वर्षाचे ३६५ दिवस २४ तास कार्यरत असतो.
• ५८ हॉट लाईन्स: महापालिकेची २४ प्रशासकीय विभाग कार्यालये, ६ मोठी रुग्णालये व २८ बाहय यंत्रणांना जोडणाऱ्या  ५८ हॉट लाईन्स कार्यरत.
• आणिबाणी प्रसंगी महापालिका आयुक्त, सर्व अतिरिक्त आयुक्त, परिमंडळीय उपायुक्त व विभागीय सहाय्यक आयुक्त यांच्यातील संदेशवहन सुलभ व्हावे, याकरिता अतिमहत्वाच्या ६१ ठिकाणांसह संबधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनांमध्ये अत्याधुनिक डिजीटल मोबाईल रेडीओ प्रणाली कार्यान्वित.
• हेल्पलाईन क्रमांक १९१६: १९१६ क्रमांकाच्या ३० लाईन्स हंटींग सुविधेसह तत्पर
• थेट दूरध्वनी क्रमांक – २२६९४७२५ / २७, २२७०४४०३ फॅक्स- २२६९४७१९
• सिसिटीव्ही कॅमे-यांद्वारे अवलोकनः मुंबई पोलीसांमार्फत बृहन्मुंबईत बसविण्यात आलेल्या ५३६१ सिसिटीव्ही कॅमे-यांचे थेट प्रक्षेपण पहाण्याकरिता व्हिडीओ वॉलची सुविधा. सिसिटीव्ही कॅमे-यांद्वारे प्राप्त होणा-या थेट चलत छायाचित्रणाचे नियमित अवलोकन.
• विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांद्वारे प्रसारित होणा-या बातम्यांचे नियमित अवलोकन करता यावे यासाठी ३ दूरचित्रवाणी संच.
• नियंत्रण कक्षातील संदेशवहन यंत्रणा कोलमडल्यास त्वरीत संदेशवहनाकरिता हॅम रेडीओ तयार ठेवण्यात आलेला आहे.
शहर आपत्ती व्यवस्थापन केंद्र येथील बॅकअप नियंत्रण कक्ष
महानगरपालिकेतील मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात काही समस्या उद्भवल्यास समन्वय कार्य अबाधितपणे व्हावे यासाठी पर्यायी नियंत्रण कक्ष (Backup Control Room) परळ परिसरातील साईबाबा मार्गावरील बेस्ट वसाहतीच्या शेजारी असणा-या शहर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत सुरु करण्यात आलेला आहे.
हा नियंत्रण कक्ष देखील संपूर्ण वर्षभर व दिवसाचे २४ तास कार्यरत आहे. तसेच येथे आवश्यक ते मनुष्यबळ कार्यतत्पर ठेवण्यात आले आहे. बॅकअप नियंत्रण कक्ष मुख्य नियंत्रण कक्षाप्रमाणेच हॉट लाईन्स, बिनतारी यंत्रणा, हॅम रेडीओ यांनी जोडलेला आहे. तसेच हेल्पलाईन क्रमांक १९१६ यावर     येणा-या तक्रारी नोंदविण्याची पर्यायी व्यवस्था आहे.

२४ प्रशासकिय कार्यालयांमध्ये ‘विभागीय नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित
१.  महापालिकेच्या मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या धर्तीवर सर्व २४ प्रशासकिय विभागांमध्ये विभागीय नियंत्रण कक्ष प्रथमच स्वतंत्र मनुष्यबळासह सुसज्ज करण्यात आले आहेत.  या प्रत्येक नियंत्रण कक्षांमध्ये थेट दूरध्वनी सेवा देण्यात आली आहे. या सोबतच बिनतारी यंत्रणा व ४ हॉट लाईन्स देखील प्रत्येक विभागीय नियंत्रण कक्षात कार्यान्वित करण्यात आले आहेत. या हॉटलाईन्सद्वारे मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष, संबंधित परिमंडळीय सहाय्यक पोलीस आयुक्त, स्थानिक अग्निशमन केंद्र व शहर आपत्ती व्यवस्थापन संस्थेतील पर्यायी नियंत्रण कक्ष यांच्याशी तात्काळ संपर्क साधता येणार आहे.
२. सर्व विभागीय नियंत्रण कक्षांमध्ये त्या-त्या प्रशासकिय विभागाचा आपत्कालीन आराखडा तयार ठेवण्यात आला आहे.
३. सर्व २४ विभागीय नियंत्रण कक्षांमध्ये स्वतंत्र मनुष्यबळः प्रत्येक विभागीय नियंत्रण कक्षात प्रत्येक सत्रात १ याप्रमाणे ३ सत्रांमध्ये ३ कर्मचा-यांची कंत्राटी पध्दतीवर नियुक्ती करण्यात आली आहे.  यानुसार सर्व २४ विभागीय नियंत्रण कक्षांमध्ये ७२ कर्मचारी तसेच पर्यायी स्वरुपातील १२ कर्मचारी या प्रमाणे एकूण ८४ नियंत्रण कक्ष चालक उपलब्‍ध आहेत.  
६. मान्सुन कालावधीमध्ये मोठया प्रमाणावर झाड किंवा झाडांच्या फांद्या पडण्याच्या तक्रारी प्राप्त होत असतात. या बाबत त्वरीत कार्यवाहीकरिता विभाग कार्यालयात कनिष्ठ वृक्ष अवेक्षक (JTO) यांची तीन्ही सत्रांमध्ये अनुक्रमानुसार नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे दिवसाचे २४ तास याबाबतचे समन्वय करणे शक्य होणार आहे.   त्याचबरोबर सर्व प्रशासकीय विभागांमध्ये पडलेली झाडे कापणे व उचलणे या करिता कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे.
७. विभागीय कार्यालयांमध्ये मान्सुन कालावधीकरिता अभियंता व कामगार वर्ग तिन्ही सत्रांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे अशासकीय संस्थांच्या कामगारांची आवश्यकतेनुसार मदत घेण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.
८. आपत्ती प्रसंगी तात्पुरता निवाराः वाहतूक व्यवस्था कोलमडल्यास विविध रेल्वे स्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवाशांकरिता, तसेच आपत्तीमुळे बेघर झालेल्या नागरिकांकरिता तात्पुरते आश्रय मिळावा म्हणून महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागातील ५ शाळा आणिबाणीत तात्‍पुरत्‍या स्‍वरुपावर एकत्रित जमण्याची ठिकाणे म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.
९. पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत शहर व उपनगरात ४७७ ठिकाणी पाण्याचा उपसा करणारे उदंचन संच बसविण्यात आले आहेत.  या पंपांच्या चालकांसोबत सुसमन्वय साधता यावा यासाठी संबंधित कंत्राटदारांचे प्रतिनिधी पर्जन्य जलवाहिन्या नियंत्रण कक्षात कार्यतत्पर आहेत.
१०. मान्सुन कालावधीत आकस्मिक खर्चाकरिता रुपये १ लाखांचे अग्रधन प्रत्येक विभागास उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
११. मान्सुन कालावधीत महापालिकेतर्फे घटनास्थळी जाऊन काम करणा-यांची  ओळख पटावी याकरिता सर्व संबंधित कामगारांना महापालिकेचे नाव असलेली ‘ब्राईट’ रंगाची रिफ्लेक्टीव्ह जॅकेट्स उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

समुद्रावरील सुरक्षितता
१. मान्सुन कालावधीत समुद्रास येणा-या मोठ्या भरतीच्या दिवशी (४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा) तसेच शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्टयांच्या दिवशी नागरिक समुद्रात बुडण्यासारख्या दुर्देवी घटना घडू नयेत, याकरिता ६ समुद्रकिना-यांवर जीवरक्षकांसह अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान, पोलीस पेट्रोलिंग वाहने तैनात असणार आहेत.
२. नागरिकांनी समुद्रात प्रवेश करुन अपघात घडू नयेत याकरिता समुद्रावर धोक्याच्या सूचना देणारे सूचना फलक लावण्यात आले आहेत.
विविध सहकारी यंत्रणांची सुसज्जता
• मुंबई अग्निशमन दलः
• पुरासारख्या आपत्कालीन परिस्थितीत काम करण्यासाठी पूर प्रतिसाद पथकामध्ये १२३ अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करण्यात आले आहेत. या कर्मचा-यांना वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला कमानी, चेंबूर, मरोळ व बोरीवली या अग्निशमन केंद्रांवर तैनात करण्यात आले आहे.
• संभाव्य पूर परिस्थिती दरम्यान आवश्यक असणारी जीवसंरक्षक सामुग्री वांद्रे, वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला कमानी, चेंबूर मरोळ व बोरीवली येथील अग्निशमन केंद्रांवर तैनात ठेवण्यात आली आहे.

• थलसेना (Indian Army):
• थलसेनेचे ५ कॉलम आणिबाणी परिस्थिती उद्भवल्यास त्वरीत मदतीकरिता तत्पर ठेवण्यात आले आहेत.  
• या तुकडयांकडे बोटी, ओबीएम व लाईफ जॅकेट्स उपलब्ध आहेत.
• नौदल (Indian Navy)
• कुलाबा, वरळी, मालाड, मानखुर्द आणि घाटकोपर येथे नौदलाची ५ पूर बचाव पथके तैनात आहेत.
• नौदलाचे १ पाणबुडी पथक कुलाबा येथे तर २ पथके उरण येथे तैनात आहेत.
• कुलाबा येथे चेतक व सी-किंग नावाचे हेलिकॉप्टर मदतीकरिता तत्पर आहे.
• आणिबाणी प्रसंगी शोध व बचाव कार्यासाठी एक स्वतंत्र जहाज तैनात आहे.
• कुलाबस्थित आयएनएस आंग्रे येथील नौदलाच्या सागरी सुरक्षा मुख्यालयात आपत्ती नियंत्रण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.
• महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून मदतीचा संदेश जाताच नौदलामार्फत खालील सुविधा पुरविण्यात येतीलः-
• मुंबईकरिता पूर बचाव पथके
• पाणबुडे
• समुद्रातील शोध व बचाव कार्य
• जहाज व हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बाधितांना सुरक्षित स्थळी हलविणे
• मदत साहित्याचे वितरण
• भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard)
• भारतीय तटरक्षक दलाची ४ पथके मान्सून कालावधी दरम्यान सज्ज ठेवण्यात आली आहेत. ही पथके कुलाबा, वरळी व मानखुर्द येथे तैनात आहेत.
• या पथकांकडे तरंगणारे तराफे, लाईफ जॅकेट्स, दोरांसह लाईफ बुआईज, प्रथमोपचार संच उपलब्ध असतील.
• तटरक्षक दलाचा निशुल्क हेल्पलाईन क्रमांक १९५४ आहे.
• भारतील तटरक्षक दलाचा वरळी येथील नियंत्रण कक्ष महापालिकेच्या मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी हॉटलाईनद्वारे जोडण्यात आलेला आहे.  
• राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (National Disaster Response Force)
• मुंबईत कोणत्याही प्रकारची आणिबाणी परिस्थिती उद्भवल्यास त्वरीत मदतकार्याकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या ३ तुकडया अंधेरी क्रीडा संकुल येथे तैनात आहेत. सन २०२३ च्या मान्सुनकरिता जास्त धोकादायक दरडी कोसळण्याची शक्यता असणा-या एम/पश्चिम, एन आणि एस विभागांकरिता दोन जादा पथके दिनांक ०८ जून २०२३ पासून तैनात करण्यात आली आहेत.
• अधिकारी व जवान मिळून एका तुकडीचे संख्याबल ४५ इतके आहे.
• या पथकाकडे अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध आहे.
• या पथकातील जवान व अधिकारी विविध प्रकारच्या आपत्तींमध्ये शोध व बचावकार्य करण्याकरिता प्रशिक्षित आहेत.
• अशासकिय यंत्रणांचा सहभागः
• अनिरुध्द अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे एकूण १२८ स्वयंसेवक व हॅम ऑपरेटर्स मान्सून कालावधीत विभागवार ऑन कॉल असणार आहेत. आणिबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता त्यांचा उपयोग करण्यात येईल.
• कुलाबा वेधशाळेकडून अतिवृष्टीचा इशारा प्राप्त झाल्यास तसेच आणिबाणी परिस्थितीबाबत नागरिकांना सतर्कतेच्या सुचना देण्याकरिता भ्रमणध्वनी कंपन्यांच्या माध्यमातून लघुसंदेश पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संकेतस्थळ
• ६० स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्र कार्यान्वितः मुंबई शहर व उपनगरात ६० ठिकाणी ६० स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. या पर्जन्यमापन केंद्रांद्वारे दर १५ मिनिटांचा अहवाल नागरिकांच्या माहितीकरिता आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या “dm.mcgm.gov.in”   या संकेतस्थळावर स्वयंचलित पध्दतीने नियमित स्वरुपात अद्ययावत केला जातो.  
• “dm.mcgm.gov.in” या संकेतस्थळावर मान्सून कालावधीत खालील माहिती प्रामुख्याने उपलब्ध करुन देण्यात येत आहेः
• समुद्रास येणा-या भरती-ओहोटीच्या वेळा व लाटांची उंची
• कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान अंदाज
• मुंबई शहर व उपनगरात होत असलेल्या पावसाचा दर १५ मिनिटांचा अद्ययावत अहवाल
• पाणी तुंबल्यामुळे वळविण्यात आलेल्या वाहतूकीची माहिती
• लोकल ट्रेन्सची वाहतूक विलंबाने होत असल्यास त्याबाबतची रेल्वे नियंत्रण कक्षाकडून प्राप्त  अद्ययावत माहिती
• विमानतळावरील विमानांच्या आवागमनावर काही परिणाम झाला असल्यास त्याची माहिती
३. ऍनिमेटेड माहितीपटः आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामार्फत आग, दरड कोसळणे, इमारत कोसळणे, बॉम्बस्फोट इत्यादी प्रकारच्या आपत्तींमध्ये काय करावे व काय करु नये याबाबतची माहिती देणारे २० ऍनिमेटेड माहितीपट (Animated Films) तयार करण्यात आले आहेत. हे सर्व माहितीपट “dm.mcgm.gov.in”  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हे माहितीपट आवश्यकतेनुसार मोफत डाऊनलोड करता येऊ शकतात.

मोबाईल ऍप
• बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत नागरिकांकरिता “Disaster Management BMC”  हे ऍप्लीकेशन ‘प्ले स्टोअर’ च्या माध्यमातून मोफत डाऊनलोड सुविधेसह उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ऍन्ड्रॉईड व आयओएस या दोन्ही प्रकारच्या प्रणालींकरिता ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
• मोबाईल ऍप ची वैशिष्ट्ये: बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील पावसाळी परिस्थितीची माहिती, भौगोलिक परिस्थितीची माहिती, आणिबाणी प्रसंगी संपर्क कुठे साधावा याबाबतची महिती अशा विविध प्रकारच्या बहुउपयोगी माहितीने हे मोबाईल ऍप सुसज्ज आहे. या मोबाईल ऍपची ठळक वैशिष्ट्ये पुढिलप्रमाणे आहेतः
• मुंबई शहर व उपनगरात होत असलेल्या पावसाचा दर १५ मिनिटांचा, दर तासाचा तसेच दर २४ तासांचा अद्ययावत अहवाल उपलब्ध आहे. विशेष म्हणजे बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील महत्वाच्या ठिकाणांनुसार तिथे पडलेल्या पावसाची माहिती देखील तात्काळ व सहजपणे बघता येऊ शकणार आहे. हवामान पर्यायांमध्ये वा-याचा वेग, वा-याची दिशा, हवेतील दमटपणाचे प्रमाण,  पर्जन्यमापनाची तिव्रता या बाबी देखील अंतर्भुत असणार आहेत.
• ज्या नागरिकांनी हे ऍप डाऊनलोड केले असेल अशा नागरिकांना समुद्रास ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटांची वेळ व उंची तसेच वेधाशाळेमार्फत जोरदार, अतिजोरदार, मुसळधार पावसाच्या अंदाजाची माहिती नोटीफिकेशन द्वारे प्राप्त होणार आहे.  
• या मोबाईल ऍपवर भारतीय हवामान खात्याच्या कुलाबा व अंधेरी स्थित दोन्ही डॉपलर रडारवरील ढगांची सद्यस्थिती, उपग्रह प्रतिमांचे (Satellite Images) निरक्षण करावयाचे असल्यास त्याकरिता थेट कुलाबा वेधशाळेशी जोडणारी लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
• पाणी तुंबल्यामुळे वळविण्यात आलेल्या वाहतूकीची माहिती देखील या ऍपवर उपलब्ध असणार आहे.
• लोकल ट्रेन्सची वाहतूक विलंबाने होत असल्यास त्याबाबतची रेल्वे नियंत्रण कक्षाकडून प्राप्त अद्ययावत माहिती देखील या ऍपवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
• विमानतळावरील विमानांच्या आवागमनावर काही परिणाम झाला असल्यास त्याची माहिती देखील ऍपवर असणार आहे.
• आपल्या विभागातील पाणी साचण्याची ठिकाणे, संभाव्य दरडी कोसळण्याची ठिकाणे, मोडकळीस आलेल्या इमारती (C-I) याबाबतची माहिती सोबतच तात्पुरत्या निवा-याची व्यवस्था करण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या शाळा, विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीत नागरिकांनी काय करावे व काय करु नये याची माहिती या ऍपवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
• या मोबाईल ऍपवर ‘SOS’ हि वैशिष्ट्यपूर्ण सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये आपल्या जवळच्या नातेवाईकांचे, मित्रांचे भ्रमणध्वनी क्रमांक जतन करण्याची सुविधा आहे.  काही आणिबाणी ची परिस्थिती उद्धभवल्यास या ऍपवर असणा-या ‘SOS’ सुविधेवर क्लिक भ्रवणध्वनी धारक क्लिक करु शकतो.  त्यानंतर लगेचच ज्यांचे भ्रवणध्वनी क्रमांक मोबाईल ऍपवर जतन केले आहेत, त्या सर्वांना भ्रमणध्वनी धारकाच्या भौगोलिक स्थानाच्या माहितीसह तात्काळ लघुसंदेश जातील. ज्यामुळे संबंधित भ्रमणध्वनी धारकास तात्काळ मदत मिळू शकेल. या सुविधेकरिता भ्रमणध्वनीमध्ये जीपीएस सुविधा कार्यान्वित असणे आवश्यक आहे.
• या भ्रमणध्वनी ऍपवर ‘Emergency’ हे वैशिष्ट्यपूर्ण व सुविधाजनक बटन देण्यात आले आहे. या बटनावर क्लिक केल्यास भ्रमणध्वनी धारक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणच्या ५०० मिटर त्रिज्येच्या (Radius) परिसरातील रुग्णालये, अग्निशमन केंद्र, पोलीस ठाणे तसेच महापालिकेच्या विभाग कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक तात्काळ दिसणार आहेत व त्यावर क्लिक केल्यास संबंधित ठिकाणाशी लगेचच संपर्क साधणे शक्य होणार आहे. या सुविधेकरिता भ्रमणध्वनीमध्ये जीपीएस सुविधा कार्यान्वित असणे आवश्यक आहे.
• या ऍपवर असणा-या ‘Safety Tips’ या सुविधेअंतर्गत २० वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तींच्या अनुषंगाने काय करावे व काय करु नये याबद्दल अत्यंत माहितीपूर्ण अशा २० ऍनिमेटेड फिल्म्स उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
• नागरिकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संपर्क व समन्वय साधता यावा याकरिता इतर सामाजिक माध्यमांच्या उदा. फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम, चॅटबॉटच्या लिंक या ऍपवर उपलब्ध असणार आहेत.

• पूर प्रवण क्षेत्राची आगाऊ सूचना देणारी प्रणाली कार्यान्वितः- बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग आणि राष्ट्रीय समुद्रीतट संशोधन केंद्र यांच्यामार्फत संयुक्तरित्या पूर प्रवण क्षेत्राची आगाऊ सूचना देणारी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीची वैशिष्ट्येः-
• IFLOWS ही मान्सून कालावधीत हवामान अंदाज व पर्जन्यवृष्टीचे निरिक्षण करुन संभाव्य पूर परिस्थितीची आगाऊ सूचना देणारी प्रणाली आहे. ही प्रणाली ६ ते ७२ तास अगोदर संभाव्य पूर-प्रवण क्षेत्रांना सतर्कतेचा इशारा देण्यास सक्षम आहे. तसेच या प्रणालीमार्फत संभाव्य पूरप्रवण क्षेत्रे, पुराच्या पाण्याची संभाव्य उंची, सर्व २४ विभागीय क्षेत्रांमधील स्थाननिहाय समस्या आणि पुराच्या संपर्कात येणाऱ्या घटकांची असुरक्षितता आणि जोखीम यांची माहिती प्राप्त होणार आहे.
• प्रणालीचा प्राथमिक स्त्रोत पावसाचे प्रमाण आहे, या प्रणालीमार्फत शहरात उद्भवणा-या पुरपरिस्थितीच्या मुल्यांकनासाठी समुद्रास असणारी दैनंदिन भरती तसेच ४.५ मीटर पेक्षा जास्त उंचीच्या लाटांची भरती विचारात घेण्यात आलेली आहे.
• उपरोक्त नमूद प्रणाली तयार करण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरु असून संशोधकांनी याकरिता बृहन्मुंबईतील पर्जन्यमान, पाणी वाहून नेण्याची क्षमता, स्थलाकृतिक, जमिनीचा वापर, पायाभूत सुविधांचा विकास, लोकसंख्या, तलाव, खाड्या आणि नदी-नाल्यातील नुसत्या पाण्याची माहिती याबाबतचा अभ्यास केला आहे. यामध्ये मिठी, दहिसर, ओशिवरा, पोईसर आणि उल्हास या नद्यांचा समावेश आहे.
• शहरातील पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्यांची क्षमता लक्षात घेऊन पूरस्थितीचा अंदाज वर्तविण्याची तरतूद या प्रणालीमध्ये आहे. या प्रणालीमध्ये अनुक्रमे Data Assimilation, Flood, Inundation, Vulnerability, Risk, Dissemination Module and Decision Support System ही सात मॉड्युल्स समाविष्ट आहेत.
• या प्रणालीमध्ये नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग (NCMRWF), भारतीय हवामान विभाग (IMD), भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM), BMC आणि IMD द्वारे स्थापित पर्जन्‍यमापक स्थानकांच्या नेटवर्कमधील माहितीचा समावेश करण्यात आला आहे.

नागरिकांना आवाहन
• नागरिकांना आपत्‍कालीन परिस्थितीत बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन विभागाशी संपर्क साधावयाचा असल्‍यास त्‍यांनी खालील माध्‍यमांचा वापर करावा –
• १९१६ मदतसेवा क्रमांक
• संकेतस्‍थळ – dm.mcgm.gov.in
• मोबाईल अॅप – Disaster Management BMC
• इन्‍स्टाग्राम – my_bmc
• ट्वीटर हॅन्‍डल – @mybmc
• फेसबुक – myBmc
• यु ट्युब – MyBMCMyMumbai
• चॅटबॉट क्रमांक – ८९९९२२८९९९
• विभागीय नियंत्रण कक्ष (संपर्क क्रमांक सोबत जोडण्‍यात आले आहेत)
• मान्‍सुन कालावधीत नागरिकांनी समुद्र किनारी पाण्‍यात जाणे टाळावे.
• अतिमुसळधार पर्जन्‍यवृष्‍टीमुळे पूर सदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली असल्‍यास साचलेल्‍या पाण्‍यातून जाणे टाळावे.
• मान्‍सुन कालावधीत गडगडाट व वीजा चमकत असताना उघड्या परिसरात जाणे तसेच झाडाखाली उभे रहाणे टाळावे.
• महाराष्‍ट्र शासन, बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जारी केलेल्‍या सूचनांचे पालन करावे.
• अफवा पसरवू नयेत व अफवांवर विश्‍वास ठेवू नये.

विभागीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक

अनु क्र. विभागाचे नाव दूरध्वनी क्रामांक
१ ए २२६२४०००
२ बी २३७९४०००
३ सी २२०१४०००
४ डी २३८६४०००
५ ई २३०१४०००
६ एफ दक्षिण २४१०३०००
७ एफ उत्तर २४०८४०००
८ जी दक्षिण २४२२४०००
९ जी उत्तर २४३९७८८८ / २४२१२७७८
१० एच पूर्व २६११४०००
११ एच पश्चिम २६४४४०००
१२ के पूर्व २६८४७०००
१३ के पश्चिम २६२३४०००
१४ एल २६५०५१०९/८६५२७५०४०५
१५ एम पूर्व २५५५८७८९
१६ एम पश्चिम २५२६४७७७
१७ एन २५०१३०००
१८ पी दक्षिण २८७२७०००
१९ पी उत्तर २८८२६०००
२० आर दक्षिण २८०५४७८८
२१ आर उत्तर २८९३६०००
२२ आर मध्य २८९३११८८
२३ एस २५९५४०००
२४ टी २५६९४०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here