Twitter : @maharashtracity

मुंबई

थायरॉईडच्या ग्रंथीच्या आजाराने घशाला येणाऱ्या सुजेमुळे खाण्यापिण्यासाठी त्रास होणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेवर मायक्रोवेव्ह एब्लेशन या तंत्रज्ञानाचा वापर करून भाभा रुग्णालयात अवघ्या १० मिनिटात शस्त्रक्रिया करुन उपचार करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांत पहिल्यांदाच हे तंत्रज्ञान वापरण्यात आले. या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण महिलेला अवघ्या २ तासानंतर खाण्यास, बोलण्यास व चालण्याची डॉक्टरांनी परवानगी दिली. त्यामुळे या महिलेला थायरॉईडच्या त्रासापासून दिलासा मिळाला असल्याची माहिती उपनगरीय रुग्णालयांच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षिका डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली.

भाभा रुग्णालयातील कान, नाक व घसा विभागातील डॉ. आम्रपाली पवार यांनी सांगितले की, कान, नाक व घसा विभागात ही महिला रुग्ण उपचारासाठी आली होती. या महिलेची वैद्यकीय तपासणी केली असता, त्यांच्या घशातील थायरॉईड ग्रंथींना मोठ्या प्रमाणात सूज असल्याचे आढळून आले. अशा प्रकारची सूज असल्यास सामान्यपणे गळ्यावर छेद देऊन शस्त्रक्रिया करण्यात येते. अशाप्रकारे करण्यात येणारी करण्यात येणारी शस्त्रक्रिया ही नाजूक व अवघड अशी शस्त्रक्रिया मानली जाते. या शस्त्रक्रियेला साधारणपणे २ तास एवढा कालावधी लागतो. तसेच शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला काही दिवसांपर्यंत रुग्णालयात राहणे आवश्यक असते. त्याचसोबत चालणे-फिरण-खाणे इत्यादीवर बंधने असतात. या शस्त्रक्रियेमुळे गळ्यावर तयार होणारे व्रण हे आयुष्यभर राहतात. या सर्व बाबी लक्षात घेऊन सदर महिलेवर अत्याधुनिक एम. व्ही. ए. पद्धतीची सूक्ष्म शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे डॉ. पवार म्हणाल्या.
मायक्रोवेव्ह एब्लेशन तंत्रज्ञान :
एम. व्ही. ए. म्हणजेच मायक्रोवेव्ह एब्लेशन तंत्रज्ञान वापरून करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेत सोनोग्राफीच्या सहाय्याने व एक सूक्ष्म सुईद्वारे ही शस्त्रक्रिया करण्यात आली. अवघ्या दहा मिनिटात झालेल्या या शस्त्रक्रिये अंतर्गत सुईद्वारे थायरॉईडमधील बाधीत पेशी नष्ट करण्यात आल्या. या शस्त्रक्रियेत गळ्यावर कोणताही छेद देण्याची गरज नसते. त्यामुळे या महिला रुग्णाला पूर्ण भूल देण्याऐवजी केवळ स्थानिक भूल देण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन तासांनी सदर महिला रुग्ण रुग्णास बोलण्याची अनुमती देण्यात आली. तसेच चालण्याची, फिरण्याची व खाद्यपदार्थ खाण्याची देखील परवानगी देण्यात आली. तर नंतर अवघ्या काही तासांनी सदर रुग्ण महिलेची वैद्यकीय तपासणी करून तिला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here