जे जे कोविड घोटाळा आणि क्लिनिकल ट्रायल प्रकरण
Twitter: @maharashtracity
मुंबई: जे जे रुग्णालयाचे मानद फिजिशियन म्हणून नियुक्त असलेले डॉ. हेमंत गुप्ता यांची रुग्णालयातून हकालपट्टी करण्यात आली आहे. कोविड घोटाळ्यापकरणी ईडीने टाकलेल्या छापेमारीत जेजे रुग्णालयातील डॉ. हेमंत गुप्ता यांचे नाव पुढे आल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. कोविड घोटाळ्यात रुग्णालयाची प्रतिमा ढासळू नये, यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने ही कारवाई केली आहे.
दरम्यान, चौकशी अद्यापही सुरु आहे. मात्र डॉ. गुप्ता हे एलएचएमएस कंपनीच्या चार मालकांपैकी एक असल्याने तपासात समोर आले असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या जे जे समुह रुग्णालयात क्लिनिकल ट्रायलचे कार्यालय अवैध सुरु होते. शिवाय यात १४ कर्मचारी कामाला होते. या कर्मचाऱ्यांचे पगार देखील होत असत. मात्र, रुग्णालयीन प्रशासन व्यतिरिक्त बाहेरील व्यक्ती येऊन क्लिनिकल ट्रायलचे कार्यालय उघडणे, तसेच त्या व्यक्तीला ती उघडण्यासाठी अधिष्ठात्याने परवानगी देणे अशा बाबी घडल्या असल्याने या प्रकरणाची चौकशी समिती तपास करत आहे. मात्र डॉ. गुप्ता यांनी कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, की क्लिनिकल ट्रायलमध्ये माझ्याविरुद्ध काहीही आढळले नाही. माझे नाव कोविड जंबो सेंटर घोटाळ्याशी जोडले गेले आहे.