Twitter : @maharashtracity

मुंबई

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज विधानसभेत सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसने अपुऱ्या पावसामुळे संकटात असलेल्या बळीराजाच्या प्रश्नाला स्थगन प्रस्तावाद्वारे वाचा फोडली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ सदस्य विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहातील कामकाज थांबवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने चर्चा करण्याची मागणी केली. मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप यामध्ये व्यस्त असलेले शेतकऱ्यांच्या दारी कधी जाणार असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्ताव फेटाळला असल्याचे स्पष्ट केले.

थोरात म्हणाले, जुलैचा तिसरा आठवडा उलटला. राज्यात अनेक भागांमध्ये पाऊस नाही. पेरण्या खोळंबल्या आहेत. दुबार तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही संकटाची घडी आहे.

ते म्हणाले, राज्यात वादळामुळे यावर्षी उशिराने मान्सुनला सुरुवात झाली. अनेक भागांमध्ये पन्नास टक्क्यांहून कमी पाऊस पडला आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. परिणामी शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. सरकारने आपली जबाबदारी ओळखून शेतकऱ्याला धीर दिला पाहिजे. दक्ष राहून मदत उपाययोजना करायला हव्या होत्या, पण काही झाले नाही. 

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, आपल्या राज्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र १ कोटी ४२ लाख आहे. पण आतापर्यंत केवळ ६८ लाख हेक्टर क्षेत्रात म्हणजे जवळपास ५० टक्के क्षेत्रात पेरण्या झाल्या. कोकण विभागात केवळ १६.३० टक्के तर पुणे विभागात केवळ ३० टक्के पेरणी झाली. राज्यातील अनेक भागात अद्याप पाऊस नसल्याने पेरणीला वेग नाही.   

file picture

पावसाचा जोर कमी असल्याने पुरेशी ओल जमिनीत तयार झालेली नव्हती. पेरण्या उशिरा होतील या भीतीपोटी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु त्यानंतर किरकोळ पाऊस झाला आणि प्रखर उष्णतेने रोपे कोमेजली आणि सोयाबीन, कपाशी व मक्याची पिके जळून दुबार पेरणीची पाळी आली आहे. खानदेश, बुलडाणा व वाशिम, परभणी, हिंगोली, औरंगाबाद तसेच नगर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये अशीच स्थिती आहे. दुबार पेरणीसाठी पुन्हा बियाणे कोठून आणणार असे संकट शेतकऱ्यांसमोर आहे, असेही थोरात म्हणाले.

​कमी पर्जन्यमानाच्या तालुक्यांमध्ये सुरुवातीला पेरण्या झाल्या. परंतु नंतर पाऊसच न पडल्यामुळे दुबार आणि तिबार पेरण्यांमुळे शेतकरी कोलमडून पडला आहे. मागील वर्षी अतिवृष्टी व वळवाचा पाऊस आणि उन्हाळ्यात झालेल्या गारपिटीची नुकसान भरपाई जाहीर करुनही शासनाने दिलेली नाही याकडे लक्ष वेधतानाच नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वनकुटे गावांत स्वत: मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाहणी केली तरी मदतीचे वाटप झालेले नाही, याचे उदाहरण त्यांनी दिले. गरज पडली तर शेतकऱ्यांना, बियाणे खते मोफत उपलब्ध करुन देण्याची उपाययोजना गरजेचे आहे. मात्र साधी चर्चाही सत्ताधारी नेते, कृषी विभाग अधिकारी करत नाहीत, असेही ते म्हणाले. 

ते म्हणाले, बी बियाणे आणि खतांची परिस्थिती राज्यात गंभीर आहे. बोगस बियाणे बाजारात येत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना धीर द्यायचे सोडून सरकारच्याच काही टोळ्या जिल्ह्यांमध्ये वसुली करत फिरत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने बघायला सरकारला वेळ नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप यात सरकार व्यस्त आहे. छोट्या गोष्टींसाठीही दिल्ली वाऱ्या करणारे सरकार शेतकऱ्याच्या दारात कधी जाणार? हे संकट कधी समजून घेणार असा संतप्त सवालही बाळासाहेब थोरात यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here