खाते-बियाणे खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास विक्रेत्याविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा : देवेंद्र फडणवीस

Twitter : @maharashtracity

मुंबई

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट या प्रश्नावर चर्चेसाठी विरोधी पक्ष आग्रही होते. मात्र चर्चा करण्याची मागणी सत्ताधारी पक्षाने अमान्य केल्यामुळे संतप्त विरोधी पक्ष सदस्यांनी सरकारचा निषेध करीत सभात्याग केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यानंतर उत्तर देताना शेती स्थितीवर सरकार लक्ष ठेवून आहे असल्याचे सांगितले. तसेच खते आणि बियाणेबाबत कुणीही शेतकऱ्यांची फसवणूक करू शकणार नाही. तसे झाल्यास असे गुन्हे अजामीनपात्र करु, अशी घोषणा केली. 

विधानसभेत आज वंदे मातरम् आणि राज्यगीत झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन मंत्र्यांचा परिचय करून दिला. तेव्हा काँग्रेस सदस्य बाळासाहेब थोरात यांनी पावसाच्या अभावी शेतकऱ्यांवरील संकट यावर तातडीने चर्चा करावी अशी मागणी केली. मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती नाकारली. तेव्हा संतप्त विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना विरोधी पक्षावर टीकास्र सोडले. सभागृहात विषय मांडण्यासाठी अनेक आयुधे उपलब्ध आहेत. मात्र यांना फक्त गोंधळ करायचा आहे. राज्यातील पाऊसमान, शेती अवस्था यावर सरकारचे लक्ष आहे. शेतकऱ्यांना बोगस खते आणि बियाणे देऊन कुणीही विक्रेता फसवू शकणार नाही, याबाबत दक्ष आहोत.  फसवणूक करण्याचे गुन्हे अजामीनपात्र करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

विरोधक पुन्हा सभागृहात आल्यावर शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी गिरीश बापट, सुरेश धानोरकर, शंकरराव वाकुळणीकर, बाबुरावजी वाघमारे, रामचंद्र अवसरे या माजी विधानसभा सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव संंमत करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब  केले.

ReplyReply allForward

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here