तक्रारीनंतर पश्चिम रेल्वेने आठ वैद्यकीय केंद्रांवर कारवाई
Twitter : @maharashtracity
मुंबई: रेल्वे स्थानकांवरील आठ आपत्कालीन वैद्यकीय केंद्र रात्री बंद ठेवल्याने कारवाई करण्यात आली. पश्चिम रेल्वेने कांदिवली, दहिसर, मीरा रोड, भाईंदर, नायगांव, नालासोपारा, विरार आणि मालाड स्थानकांवरील बंद असलेल्या आपत्कालीन वैद्यकीय केंद्राना ४० हजार रुपये दंड ठोठावला आहे. तक्रारीनंतर पश्चिम रेल्वेनेही कारवाई केली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते समीर झवेरी यांनी दिली आहेत. रेल्वे अपघातातील जखमी व रेल्वे प्रवासात अचानक प्रवाशांची प्रकृती खराब झाल्यास त्यांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळावी, यासाठी रेल्वे स्थानकांवर २४ तास आपत्कालीन वैद्यकीय केंद्र सुरु करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने रेल्वेला आदेश दिले होते. मात्र, या निर्देशाचे काटेकोरपणे पालन रेल्वे प्रशासनाकडून होत नसल्याचे वारंवारं समोर आले आहे.
रेल्वे बोर्डाने (Railway board) देशातील सर्व रेल्वे स्थानकावर वैद्यकीय केंद्र उभारण्याचे आदेश दिनांक २३ मार्च २०१८ रोजी दिले होते. त्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने या आदेशाचे पालन करत रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय केंद्र (emergency medical unit) सुरु केले होते. यांची जबाबदारी खासगी हॉस्पिटल आणि औषध निर्माण कंपन्या दिले आहेत. मात्र, पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) अनेक रेल्वे स्थानकांवर न्यायालयाच्या आदेशांचे पालन होत नसल्याचे समोर आले. बऱ्याच स्थानकांतील आपत्कालीन वैद्यकीय केंद्र रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यत बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचेही उघड झाले. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते समीर झवेरी यांनी पश्चिम रेल्वेकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पश्चिम रेल्वेने रात्री बंद असलेल्या ८ आपत्कालीन वैद्यकीय केंद्रावर कारवाई केली आहे. कांदिवली, दहिसर, मीरा रोड, भाईंदर, नायगांव, नालासोपारा, विरार आणि मालाड स्थानकांवर त्यांच्याकडून ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहेत.
दरम्यान, मध्य आणि पश्चिम रेल्वेवर दररोज ७५ लाख पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. मात्र, पाहिजे त्या सुविधा देण्यास रेल्वेला अपयश आले आहे. सध्याच्या परिस्थितीत ३२ रेल्वे स्थानकावर आपत्कालीन वैद्यकीय केंद्र आहे. आपत्कालीन वैद्यकीय केंद्र चालविण्यावर रेल्वे प्रशासनाकडून जाचक अटी आहेत, असे सांगण्यात येत आहे.