मे महिन्यात ६५७८ ठिकाणी डेंग्यू तर ७५० ठिकाणी मलेरिया आढळला

Twitter: @maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहे, मात्र डेंग्यू तसेच मलेरियावर नियंत्रण मिळविणे पालिका प्रशासनाला अशक्य होत आहे. मे महिन्यात ६,५७८ ठिकाणी डेंग्यूचा फैलाव करणारे एडिस तर मलेरियाचे डास अळ्या ७५० ठिकाणी आढळल्या. पालिकेच्या कीटक नाशक विभागाने घरोघरी जाऊन जानेवारी ते मे महिन्यापर्यंत पाहणी केली. यात आश्चर्य म्हणजे मे महिन्यात सर्वाधिक मलेरिया व डेंग्यूच्या फैलाव करणारे डास आढळले असल्याचे पालिका किटकनाशक विभागाकडून सांगण्यात आले.

पालिकेने केलेल्या कारवाईत जानेवारीमध्ये मलेरिया पसरवणाऱ्या एनोफिलीस डासाची २३५ ठिकाणे आढळली होती. तर फेब्रुवारीमध्ये २२६, मार्चमध्ये ३८४, एप्रिलमध्ये ५२४ तर फक्त एका मे महिन्यात ७५० ठिकाणी मलेरिया पसरवणारा एनोफिलीस डास आढळला आहे. तर डेंग्यू पसरवणारा एडिस डास जानेवारीत ३२४३ ठिकाणी, फेब्रुवारीत २७३० ठिकाणी, मार्चमध्ये ४७४६ ठिकाणी, एप्रिलमध्ये ४६४८ ठिकाणी आढळला आहे. तर फक्त मे महिन्यात तब्बल ६५७८ ठिकाणी डेंग्यू पसरवणारा एडिस डास आढळला असल्याचे सांगण्यात आले. जानेवारीपासून मे अखेरपर्यंत एकूण २१३७ ठिकाणी एनोफिलीस तर २१९४५ ठिकाणी एडिस अशा एकूण २४ हजार ०८२ ठिकाणी मलेरिया, डेंग्युची उत्पत्ती ठिकाणे आढळली असून ती पालिकेने नष्ट केली आहेत. तर तपासणीनंतर २८४० जणांना नोटीस बजावली असून बेजबाबदार ६७ जणांविरोधात न्यायालयीन कार्यवाही सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here