डॉक्टरांच्या समस्यांचे वैद्यकीय शिक्षण आयुक्तांना निवेदन

Twitter :@maharashtracity

मुंबई :

मध्यवर्ती मार्ड संघटनेने पुन्हा एकदा सरकारचे लक्ष निवासी डॉक्टरांच्या मागण्यांकडे वेधले आहे. वारंवार पाठपुरावा करुनही सरकारने डॉक्टरांच्या अनेक मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. याच्याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाच्या आयुक्तांना यासंबंधित निवेदन करण्यात आले आहे. कामाच्या वाढलेल्या ताणामुळे निवासी डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. निवासी डॉक्टरांमध्ये नैराश्य आणि आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे काही महत्त्वाच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. संबंधित मागण्या मार्ड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात मांडल्या असून निवासी वसतीगृह, स्टायपेंड वाढवणे आणि स्टायपेंडमध्ये नियमितता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवासी डॉक्टरांची मानसिक स्थिती या काही गंभीर मुद्यांवर त्यांनी प्रकाश टाकला आहे.

कामाच्या वाढलेल्या ताणामूळे निवासी डॉक्टरांमध्ये नैराश्य आणि आत्महत्यांच्या घटनांमध्ये  वाढ होत आहे. त्यामुळे, काही महत्त्वाच्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी यात करण्यात आली आहे. त्यासाठी महाविद्यालयीन स्तर आणि राज्यस्तरीय समस्या निवारण समित्यांची निर्मिती करुन डॉक्टरांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी, शोधण्यासाठी व्यासपीठ म्हणून काम करतील, मार्गदर्शन, आणि त्यांना येणाऱ्या कोणत्याही आव्हानांसाठी मदत मिळवता येईल, असे सुचविण्यात आले आहे. सद्यस्थितीत पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांच्या सीट्स वाढल्या आहेत. त्या तुलनेत राहण्याची सोय कमी पडत आहे. त्या जागी विद्यार्थी गर्दी करुन राहतात. अशा वेळेस राहण्याची योग्य सोय उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे, निवासी वसतीगृहाचे काम लवकर करुन विद्यार्थ्यांना राहण्याची सोय करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

आम्हाला विश्वास आहे की या मागण्यांचे निराकरण केल्याने अधिक अनुकूल वातावरण निर्माण होईल. निवासी डॉक्टरांमुळे रुग्णांची योग्यरित्या काळजी घेता येते. या समस्यांवर एकत्रितपणे चर्चा करून उपायांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
डॉ. अभिजीत हेलगे, अध्यक्ष, मध्यवर्ती मार्ड. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here