Twitter : @maharashtracity
मुंबई
उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंतप्रधान भेटीबाबत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव परिषदेत सोमवारी मांडला. मात्र, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य शशिकांत शिंदे यांनी आक्षेप घेत बाहेर सुरु असलेल्या चर्चेनुसार मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव म्हणजे निरोपाचा ठराव तर नाही ना, असा सवाल शिंदे यांनी विचारला.
शिंदे म्हणाले कि, राष्ट्रवादीच्या ९ सदस्यांना मंत्री करून वेगळा संदेश देणार आहेत का, असा सवाल विचारात मागच्या कृषी मंत्र्यांच्या कारभारबद्दल चौकशी करणार का? असा सवालही त्यांनी विचारला. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव का मांडला असा प्रश्न पडला असल्याचे सांगत शिंदे यांनी खरपूस टीका केली. देशाच्या पंतप्रधानांनी बोलावलेले हे पहिले मुख्यमंत्री आहेत का? कि यांना कुटुंबासह भेट दिली हे विशेष आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या व्यक्तिगत भेटीबाबत ठराव सभागृहात मांडण्याची गरज काय? अशी शंका शिंदे यांनी उपस्थित केली.
यातून बाहेर सुरु असलेल्या चर्चेची आठवण झाली असल्याचे सांगत शिंदे म्हणाले, हा शिंदे यांचा निरोपाचा समारंभ आहे का ? मुख्यमंत्री बदलणार का? भावी मुख्यमंत्री अशीही चर्चा बाहेर सुरु असल्याचे शिंदे म्हणाले. त्याचवेळी हा ठराव आणताना मुख्यमंत्र्यांवर विश्वास दाखविण्यासाठी हा ठराव तर आणला तर नाही ना ? असेही शिंदे म्हणाले.