उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पत्राद्वारे वेधले राज्यपालांचे लक्ष

By Sadanand Khopkar

Twitter: @maharashtracity

मुंबई: राज्यातील विद्यापीठात असलेल्या मुलींच्या वसतिगृहात अनेक गैरसोयी असतात. त्याचा सामना मुलींना करावा लागतो. तक्रारी करूनही फायदा होत नसल्याने या विद्यार्थिनींनी विधान परिषद उपसभापती डॉ निलम गोऱ्हे यांना निवेदन देऊन न्यायाची मागणी केली. त्यावर डॉ गोऱ्हे यांनी राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहून राज्यातील विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील समस्या सोडविण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी विनंती केली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील (Kalina campus of Mumbai University) महर्षी धोंडो केशव कर्वे मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींनी डॉ गोऱ्हे यांची भेट घेऊन तक्रारींचा पाढा वाचला. या वसतिगृहातील रहिवासी विद्यार्थिनींना सध्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईबाबत विचारणा करण्यासाठी वसतिगृहातील मुली वॉडर्नना भेटण्यासाठी गेल्या होत्या, मात्र वॉर्डन या मुलींना भेटल्याच नाहीत. त्यामुळे या मुलींनी रात्रभर वॉर्डनच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन केले. 

याबाबत मुलींनी अनेकदा तक्रार करूनही काही कार्यवाही झालेली नाही. डिसेंबर महिन्यात या विद्यार्थिनींनी रजिस्टारकडे या गैरसुविधाविषयी तक्रार केली होती. याबाबत पाहणी करूनही परिस्थितीत बदल झालेली नाही. 

वॉर्डनची अनुपस्थिती, लिपिक आणि शिपाई यांच्यामुळे झालेला गैरसंवाद, कार्यालयीन वेळेनंतर आपत्कालीन क्रमांक उपलब्ध नसणे. मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत (वॉशरूमची समस्या, खोल्या, फर्निचर, अस्वच्छ पाणी, डास, अस्वच्छ परिसर) पिण्याचे पाणी, गरम पाण्याची तसेच वापराच्या पाण्याची समस्या, इलेक्ट्रिसिटी यासंदर्भात या विद्यार्थिनींनी डॉ गोऱ्हे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.

उपसभापती डॉ गोऱ्हे यांनी या तक्रारींची दखल घेत राज्यपाल यांना पत्र लिहून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, सार्वजनिक बांधकाम व उपक्रम मंत्री, मुंबई विद्यापीठ कुलगुरू यांना वरील तक्रारी निवारण करण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी विनंती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्राद्वारे केली आहे. डॉ गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री यांनाही पत्र लिहून समस्यांचे तत्काळ निवारण करण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी सूचना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here