Twitter: @maharashtracity

नागपूर: कर्करोग पिडीत रुग्णाला त्रास देण्यासोबतच त्याच्या कुटुंबियांची हिंमत देखील खचवतो. अशा परिस्थितीत एनसीआयसारख्या संस्था उपचारासोबतच आधार देण्याचेही काम करतात. अशा स्तुत्य प्रकल्पासाठी जनतेतर्फे धन्यवाद, वैयक्तीक आशीर्वाद आणि सरसंघचालक म्हणून शाबासकी देत असल्याचे कौतुकोद्गार सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काढले. नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे गुरुवारी डॉ. भागवत यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी उपस्थितांचे मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगपती गौतम अदानी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार अजय संचेती, संस्थेचे अध्यक्ष ऍड. सुनील मनोहर प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी सरसंघचालक म्हणाले की, आरोग्य विषयक संकटांचा सामाना करताना माणूस आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचतो. कर्करोग रोग तर शरीरासोबत मनोबलही कमी करतो. अशावेळी समाजात अशा संस्थांच्या उभारणीचा संकल्प सोडून तो पूर्णत्वास नेणाऱ्या व्यक्ती, आणि संस्थांची समाजाला गरज आहे. लोकोपयोगी आणि समाजोपयोगी कामे हेच खरे संघ कार्य आहे. या प्रकल्पामागे संघ उभे असल्याचे सांगण्यात आले. 

समाज आणि देशाच्या हिताचे काम करणे हेच संघकार्य असून संघ अशा कामांच्या पाठीशी उभा राहात असल्याचे सरसंघचालकांनी स्पष्ट केले. स्वप्न पाहाणे आणि ते पूर्ण करणे यात अंतर आहे. एक टीम म्हणून सगळ्यांनी प्रयत्न केले तर संकल्प आणि स्वप्न लवकर पूर्ण होते याचे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट हे एक उत्तम उदाहरण आहे. संघाचे स्वयंसेवक एखादे उत्तम काम उभे करतात तेव्हा मन अभिमानाने भरून येते. याही प्रकल्पाबाबत “शाब्बास’ म्हणावेसे वाटते. सर्वोत्तमाचा ध्यास घेऊन काम करणे याचे प्रयत्न असले पाहिजे. सेवा वृत्तीने हे रूग्णालय पुढे सुरू राहिले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मध्य भारतात पहिल्यांदाच एनसीएमध्ये पेडियाट्रिक वॉर्ड सुरू करण्यात आला असून येथे मुलांवर नि:शुल्क उपचार केले जातात. येथे येणाऱ्या रूग्णांच्या नातेवाईकांना राहाण्यासाठी लवकरच येथे एक धर्मशाळा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. थॅलेसेमीया व सिकलसेल असे दोन उपचार केंद्र येणाऱ्या दिवसात सुरू करण्यात येईल. मोठ्या प्रमाणावर कर्करोग निदान शिबिरे आयोजित होत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, अमेरिकेत कर्करूग्णांची 33 टक्के रूग्णसंख्या कमी झाली. तर भारतात कर्करोग रूग्णांचे आणि त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत या रूग्णालयाचे महत्व खूप मोठे आहे. ही संस्था जागतिक दर्जाची संशोधन संस्था व्हावी अशी अपेक्षा गडकरींनी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य व्यवस्था मोठे आव्हान असल्याचे सांगितले. कर्करोग हा धोकादायक आणि काळजीचा विषय असल्याचे सांगितले. टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या मदतीने ठाण्यात कर्करोग रूग्णालय उभारीत असल्याचे सांगितले.

कर्करोगाने हिरवले नेत्यांचे आप्त

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस, एनसीआयचे संस्थापक शैलेश जोगळेकर यांची पत्नी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आई तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची मुलीसमान भाची यांचे कर्करोगाने निधन झाले. या सर्वांचा कंठ त्यांच्याविषयी बोलताना दाटून आला होता. माझ्या घरीच वाढलेली आणि मुलीसारखी असलेल्या भाचीचे नुकतेच कर्करोगाने निधन झाले हे सांगताना गडकरींना गहीवरून आले होते. कर्करोगाने जवळचा माणूस गमावण्याचे दु:ख काय असते हे आम्ही सर्वच जाणतो. म्हणून एनसीआय उभी राहिली असे फडणवीस यांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here