By Anant Nalawade
Twitter: @nalavadeanant
मुंबई: संविधानाच्या रक्षणासाठी आणि राज्यातल्या घटनाबाह्य सरकारविरोधात महाविकास आघाडी गेले अनेक महिने राज्यभर आवाज उठवत आहे. महाराष्ट्रात या आधी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे संविधान रक्षणासाठी ‘वज्रमूठ’ सभा झाल्या. त्यानंतर आता महाविकास आघाडीची पुढची ‘वज्रमूठ’ सभा महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून, १ मे २०२३ रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथे संपन्न होणार आहे.
मुंबईत होणाऱ्या या सभेच्या नियोजनासाठी महाविकास आघाडीच्या पुढाकाराने महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवासैनिक नियोजनात सहभागी झाले आहेत.
१ मे २०२३ रोजी, वांद्रे येथील वांद्रे कुर्ला संकुल म्हणजेच बि के सी येथे सायंकाळी ५.३० वाजता महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ सभेला सुरुवात होईल. राज्यभरात महाविकास आघाडीला मिळत असलेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मुंबईत कळस गाठेल आणि अतिभव्य अशी सभा होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.