अंथरूणावर खिळलेली महिला दहा दिवसात पायावर उभी राहिली

मुंबई: मणक्याच्या क्षयरोगाने ग्रासलेल्या, त्यातून अंथरुणाला खिळलेल्या २२ वर्षे वयाच्या तरुणीवर दुर्मीळ स्वरूपाची शस्त्रक्रिया करून तिला पूर्णपणे बरे करण्याची किमया मुंबई महानगरपालिकेच्‍या व्ही.एन. देसाई रूग्‍णालयाने स्पाइन क्लिनिकच्या सहकार्याने साध्य करून दाखवली आहे. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर अवघ्‍या दहा दिवसात ही तरुणी किमान आधार घेऊन चालू लागली आहे.

यावर बोलताना व्ही. एन. देसाई महानगरपालिका रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरबंससिंग बावा यांनी सांगितले की, मणक्‍याच्‍या व्‍याधीने ग्रस्‍त एक २२ वर्षीय तरुणी मागील आठवड्यात व्ही. एन. देसाई सर्वसाधारण रूग्णालयात दाखल झाली. या महिलेला चालता येत नव्‍हते, पायांची हालचाल करता येत नव्‍हती. महिनाभर त्‍या अंथरूणास खिळून होत्या. त्यामुळे मुत्राशय आणि ओटीपोटावर देखील परिणाम झाला होता.

सर्वात महत्वाचे म्हणजे, स्थानिक ढोंगी वैद्याकडून झालेल्या बनावट उपचारांमुळे या तरुणीचा हा आजार बळावला होता. अगदी तरुण वयात आजाराने बेजार झालेल्या या तरुणीच्या आजाराचे संपूर्ण निदान करण्यासाठी एम.आर.आय. तपासणी करण्यात आली. त्यातील निष्कर्षानुसार, या तरुणीला मणक्याचा क्षयरोग झाल्‍याचे तसेच त्यामुळे मणक्यातील विविध नसांवर दाब निर्माण झाल्याचे आढळले. एकंदरीत, आजाराने धारण केलेले तीव्र रूप हे क्वचित आढळणारे असे होते. 

या आजारातून तरुणीला संपूर्णपणे बरे करण्यासाठी शस्त्रक्रिया करणे हा एकमेव पर्याय समोर होता. मात्र तो अत्यंत खर्चिक होता. रुग्णाची आर्थिक स्थिती देखील साधारण स्वरूपाची होती. अशा स्थितीत स्पाइन फाऊंडेशनने, रूग्णालयात कार्यरत स्पाइन क्लिनिकच्या माध्यमातून सहकार्याचा हात पुढे केला. व्ही. एन. देसाई रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक तसेच स्पाइन क्लिनिकचे रुग्णालयातील मानद वैद्यकीय सल्लागार, मणक्यांच्या विकारातील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. शेखर भोजराज, डॉ. प्रेमिक नागद यांनी संयुक्तपणे ही अवघड शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले. त्यानंतर, या तरुणीच्या मणक्यावर डिकाॅम्प्रेशन व हार्टशील फिक्सेशन शस्‍त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. 

शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी ही तरुणी स्‍वत:च्‍या पायावर उभी राहू शकली, तर अवघ्‍या दहा दिवसात त्या कमीत कमी आधार घेऊन चालू लागल्या आहेत. रुग्णाचे मुत्राशय व ओटीपोट पूर्ववत झाले आहे. तरुण महिला आजारातून पूर्णपणे बरे सावरून चालू लागली.

व्ही. एन. देसाई रुग्णालयातील स्पाईन क्लिनिक मध्ये सन २००९ पासून आजवर मणक्‍याच्‍या ३७ हजार रूग्णांवर यशस्‍वी उपचार, तर १ हजाराहून अधिक शस्त्रक्रिया देखील यशस्वी करण्यात आल्या. केईएम रुग्णालयात १९८८ ते १९९३ दरम्यान अस्थिरोग विभाग प्रमुख असलेले डॉ. शेखर भोजराज यांनी अस्थिरोग उपचार क्षेत्रातील वैद्यकीय तज्ज्ञांना एकत्र आणून स्पाइन फाउंडेशनची स्थापना केली. गरजू रुग्णांसाठी समाजसेवी तत्वावर फाउंडेशनकडून उपचार केले जातात. 

ग्रामीण भागात सेवा पुरवत असताना, मुंबईतील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांसाठी समर्पित केंद्र सुरू करण्याचा निर्णय फाउंडेशनने घेतला. महानगरपालिकेत सेवा बजावलेली असल्याने डॉ. भोजराज यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्ही. एन. देसाई रूग्णालयात सेवाभावी तत्वावरील स्पाइन क्लिनिक सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आणि मणक्यांच्या रुग्णांना विशेषज्ञ सेवा देण्याच्या हेतूने, महानगरपालिकेने रुग्णालयात जागा उपलब्ध करून दिली. सप्टेंबर २००९ मध्ये क्लिनिक सुरू झाले.  २००९ पासून आजवर तब्बल ३७ हजार रूग्णांवर व्ही. एन. देसाई रुग्णालयाने या क्लिनिकच्या माध्यमातून उपचार पुरवून बरे केले आहे. तर, सुमारे १ हजार ०५२ अत्यंत कठीण अशा शस्त्रक्रिया रुग्णालयात यशस्वीपणे पार पडल्या आहेत. ऑसिपिटो सर्व्हायकल फ्युजन, टॅन्डम, सर्व्हायकल, डिफाॅर्मेटि करेक्शन यासारख्या जोखमीच्या शस्त्रक्रियांचा यात समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here