Twitter: @vivekbhavsar

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतंत्रपणे खेड आणि मालेगावात घेतलेल्या सभेला आणि महाविकास आघाडीच्या नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या सभेला आयोजकांना अपेक्षा नसेल इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मुस्लिम बहुल भागात झालेल्या सभेला मुस्लिम समुदायाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. काँग्रेस, समाजवादी पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम कडून भ्रमनिरास झालेला हा समाज उद्धव सेनेकडे अपेक्षेने बघतो आहे. याचा अर्थ बदल घडत आहे. इथे लोकांना प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात पर्याय हवे आहेत. ते देण्याची तुमची तयारी आहे का? उद्धवजी केवळ सभा घेऊन तुमची शिल्लक सेना (हा शिंदे गटाचा शब्द) वाढणार आहे का? अजूनही तुम्ही कोषातून बाहेर यायला तयार नाहीत. सामान्य जनता राहू द्या बाजूला, तुमच्या शिल्लक सेनेतील आमदारांनाही तुम्ही भेटत नाहीत या तक्रारी, तुमचे मुख्यमंत्रीपद गेले तरी कायम आहेत. असेच सुरू राहिले तर २०२४ मध्ये महाविकास आघाडीची सत्ता येण्याची जी काही शक्यता आहे, त्यात तुम्ही कुठेही नसाल आणि राष्ट्रवादीने तुम्हाला संपवलेले असेल. 

उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री झालात तेव्हा मी याच स्तंभातून लिहिले होते की सगळ्यात मोठी अडचण पत्रकारांची होणार आहे, कारण तुम्ही पत्रकारांना भेटत नाही. तुम्ही तर कमालच केली, पत्रकारच नव्हे तर तुमच्या पक्षाच्या आमदारांनाही तुम्ही भेटत नव्हता, मातोश्रीवर waiting ला ठेवत होता. त्याचा काय परिणाम झाला ते आता दिसते आहे. कोरोना होता, आजारी होता ही कारणे तुमच्याकडून वारंवार दिली गेली. पण ८० वर्षाचा एक तरुण गेले १८ वर्षे भळभळती जखम घेऊन आजही कर्मायोग्या प्रमाणे कार्यरत आहे, भाजपला बाजूला सारून आणि तुम्हाला सोबत घेऊन सरकार बनवण्यात यशस्वी ठरला होता, हे उदाहरण नजरेसमोर असताना तुम्ही आजही घरात बसून असतात.

उद्धवजी कधी तरी शिल्लक राहिलेल्या आमदारांशी मनमोकळे बोलून बघा, त्यांनी वेळ मागितली तर लगेच वेळ द्या, मातोश्रीवर भेटायला आलेल्या आमदारांशी बसून बोला, उभ्या उभ्या दोन चार मिनिटात काहीतरी बोलून त्यांची बोळवण करू नका, बघा किती फरक पडतो. एक आमदार गेले दोन वर्षे वेळ मागत आहे आणि तुम्ही वेळ देत नाहीये… गेला ना तो भाजपकडे… शरीराने अजून तुमच्या पक्षात आहे, पण मनाने कधीच तिकडे गेला आहे.

संवाद फार महत्वाचा असतो. तोच तुमच्याकडून आणि युवराजाकडून साधला जात नाही. असेच सुरू राहिले तर विधान परिषदेतील राहिलेले आमदारही तुमची साथ सोडून जातील. ज्याला जायचे त्याने खुशाल जावे हा attitude योग्य नाही. तुम्ही पालक आहात, कोण नाराज आहे, का नाराज आहे हे जाणून घेणे आणि त्यावर मार्ग काढणे याला तुमचे प्राधान्य असायला हवे. 

उद्धवजी, अजूनही वेळ गेलेली नाही. महापालिका निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यानंतर लोकसभा आणि नंतर विधानसभा.. शिवसेनेत फूट पडली, नेते, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. पण सामान्य शिवसैनिक अजूनही तुमच्या सोबत आहे. पण तुम्ही त्यांना काय देत आहात? शिंदे गटातील अनेक खासदार आणि आमदार पुढे निवडून येतील याची शक्यता नाही. अशा वेळी त्या मतदारसंघात तुम्ही कुठला पर्याय देणार आहात? तिथल्या शिवसैनिकाला बळ देऊन, पाठीवर हात ठेऊन कधी सांगितले का, की तू तयारी कर, आम्ही तुझ्या सोबत आहोत.. नाही. अजूनही तुम्ही चाचपडत आहात. 

मी पूर्वी ही लिहिले होते की तुम्हाला शक्य नसेल तर आदित्य ठाकरे यांनी जनतेसाठी वेळ द्यायला हवा. आता तर तुमच्या पक्षाची अवस्था अत्यंत वाईट आहे. केवळ आदित्य नव्हे तर तुम्हीही शिवसेना भवनात आठवड्यातून दोन दिवस बसायला हवे. उर्वरित दिवस आदित्य यांनी बसावे. जिल्ह्यांना वार ठरवून द्या. येऊ द्या ना लोकांना तुम्हाला भेटायला, ऐकून घ्या त्यांचे म्हणणे. सेल्फी काढू द्या. कामे झाली नाहीत तरी आपला नेता भेटला या आनंदात तुमचा शिवसैनिक त्याच्या मतदारसंघात जोमाने काम करेल. 

आदित्य यांच्याबद्दल सनदी अधिकाऱ्यांमध्ये खूप चांगली प्रतिमा होती. हुशार आहे, विषय समजून घेण्याची हातोटी आहे, सगळे खरे आहे. आदित्य यांचा पर्यावरण आणि climate change वर चांगला अभ्यास आहे, त्यांना जागतिक ओळख मिळाली आहे. पण जागतिक नेता होण्याच्या नादात वरळी हा मतदार संघ निसटतो आहे, याचे भान त्यांना नाही. ज्या नेत्यांच्या राजकीय बलिदानावर, सपोर्ट वर आदित्य निवडून आले आहेत, ते पक्ष सोडून गेले तर आश्चर्य वाटणार नाही. 

मुख्यमंत्री असतानाही तुम्ही कधी आमदार आणि जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांच्या संयुक्त बैठक घेतल्या नाहीत, कधीही तुमच्या स्थानिक पदाधिकऱ्यांची शासकीय अधिकाऱ्यांची ओळख करून दिली नाही. कशी होणार तुमच्या पदाधिकाऱ्यांकडून जनतेची कामे? आता तुम्ही काय करतात? कोणीतरी एखाद्या पोलीस स्टेशनचे काम घेऊन येते आणि तुमच्या अवतीभवती असलेले नेते पोलिसांना शिव्या घालतात, पोलिसांचा अपमान करतात,  असे शिव्या घालून आणि चिडून पोलीस कधी तुमचे काम करणार आहेत का? सनदी अधिकारी यांच्याकडे कामे घेऊन जा. माजी मुख्यमंत्री म्हणून अजूनही तुमच्या शब्दाला मान आहे. तुमची म्हणजे तुमच्याकडे कामे घेऊन आलेल्या शिवसैनिकांची कामे होतील. 

Also Read: एमआयडीसीत असे अधिकारी असतील तर कशी गाठणार १ ट्रीलियन डॉलरची अर्थव्यवस्था?

शिवसेनेचा जन्मच मुळात 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे उद्दिष्ट घेऊन झाला होता. शाखेमध्ये लोकांच्या प्रश्नांना उत्तर मिळत होते, समाधान केले जात होते. आज कुठे आहे समाजकारण? शिवराळ भाषेमध्ये सुरू असणारे राजकारण सुरू आहे. तुमची स्वतःची भाषा बघा. नामर्द, अवलाद, नपुंसक, षंढ, औरंगजेबाची अवलाद आणि काय काय.. तुम्हाला काय वाटते जनतेला, शिवसैनिकाला हे शब्द आवडतात? अजिबात नाही. आता तर तुमची एकच टेप वाजते.. पक्ष पळवला, चिन्ह पळवले आणि बापही पळवला. लोकांना हे सगळे माहिती आहे. वारंवार त्याचा उल्लेख करून तुम्ही सहानुभूती गमावत आहात. 

खरे तर आता मतदारांना माहित झाले आहे की ज्याचे चिन्ह धनुष्यबाण असेल, शिवसेना पक्ष असेल तो उमेदवार शिंदे गटाचा असेल. खरा शिवसैनिक त्याला कधीच मतदान करणार नाही. तरीही तुम्हाला इतके असुरक्षित का वाटते? भाजपने साथ सोडल्यावरही आणि बाळासाहेब हयात नसतांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही स्वबळावर ६३ आमदार निवडून आणले होते. तेव्हा तर तुमच्या पक्षाचे बहुसंख्य ज्येष्ठ नेते शिवसेना संपली, उद्धव काही आमचा नेता नाही, असा एकेरी उल्लेख करून उद्धवला आम्ही नेता मानत नाही, अशी खाजगीत चर्चा करत असत. प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही तुमचे नेतृत्व सिद्ध केले होते.  पण, तुम्हाला न शोभणारी भाषा वापरून तुम्ही हळू हळू शत्रू निर्माण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तुमच्यावर लोभ होता. पण मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल अत्यंत हिन भाषा वापरून तुम्ही मोदी यांचा विश्वास गमावला. राजकारणातील तुमचा सच्चा मित्र देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही गमावले. राजकीय विरोधक कधी एकमेकाचे शत्रू झाले हे तुम्हालाही कळले नाही.

या आगीत तेल ओतण्याचे काम केले तुमच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने. शिवसेनेचं आज जेवढे नुकसान झाले आहे त्याला कारणीभूत हे प्रवक्ते आहे. पक्षाला जिवंत ठेवायचे असेल आणि अजून नुकसान होऊ नये असे वाटत असेल तर या प्रवक्त्यांचा सकाळी १० वाजता सुरू होणारा daily soap बंद करा. बघा किती फरक पडतो.

तुमचे बंधू .. भाषणातून, सभेतून भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर किती टीका करतात? त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही सोडले नव्हते. पण एखाद्या सामाजिक विषयावर याच नेत्यांना भेटायला जाण्यात त्यांना कधीच संकोच वाटला नाही. तुम्ही तर माजी मुख्यमंत्री आहात. राजकीय मतभेद बाजूला सारून सत्ताधारी पक्ष नेत्यांशी संवाद ठेवायला काय हरकत आहे? त्यातून राजकीय कटुता कमी होईल. पक्षीय मतभेद असू द्या… पण संवाद तर ठेवा? अडचणीतील लोक न्यायासाठी राज ठाकरे यांच्याकडे जातात, तुमच्याकडे येत नाहीत. राज काही सत्तेत नाहीत, तरीही लोकांना विश्वास वाटतो. तुमच्याबद्दल कधीच तसा विश्वास कोणाला वाटला नाही.

याला कारण म्हणजे तुमच्या भोवती असलेली तथाकथित सल्लागार मंडळी. बोली भाषेत आपण त्यांना चौकडी म्हणतो. ही लोक सामान्य माणसाला तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही. उद्धवजी तुम्हाला तर हे देखील माहिती नाही की ज्यांचावर तुम्ही जास्त विश्वास ठेवता ते भाजप आणि राष्ट्रवादीचे खबरी आहेत. अनिल परब हे संघटना आणि निवडणूक जिंकण्याचे धोरण राबवण्यात निष्णात आहेत. अनिल देसाई पक्षाच्या कायदेशीर बाबी बघण्यात व्यस्त आहेत. यांचा पुरेसा फायदा करून घ्यायला हवा. मात्र, मध्येच बातमी पसरवली जाते की परब यांना मातोश्रीपासून दूर केले गेले. किरीट सोमय्या यांना पुरुन उरलेले परब ही पक्षाची asset आहे. अन्य जी भारुड भरती तुमच्या अवती भवती आहे, तिला दूर करा आणि २०१४ पूर्वी जसे तुम्ही स्वतः निर्णय घेत होता, तसा घ्यायला सुरवात करा.

उद्धव जी, स्वतःचे हिशेब चुकते करण्यासाठी तुमचेच काही नेते तुमच्या खांद्याचा वापर करत आहेत. तुमचा त्यांनी अभिमन्यू केला आहे. हे जर तुम्ही ओळखले नाहीत तर तुमचे नेतृत्व आणि तुमचा पक्ष याची अवस्था महाभारतातील अभिमन्यू सारखी होण्यास वेळ लागणार नाही. 

विवेक भावसार

संपादक,

Maharashtra.city

TheNews21.com

Cell – 9930403073

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here