पर्यटन मंत्री लोढा यांची विधानसभेत घोषणा

By Anant Nalawade

Twitter : @nalawadeanant

मुंबई: दूबई फेस्टिवलच्या धर्तीवर येत्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईत मुंबई फेस्टिवल आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गुरुवारी विधानसभेत केली. या मुंबई फेस्टिव्हलला एक कोटी पर्यटक भेट देतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आज विधानसभेत सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातील पर्यटन, सांस्कृतिक कार्य, अल्पसंख्याक विकास, इतर मागास बहुजन कल्याण आणि दिव्यांग कल्याण विभागाच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या. त्यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना लोढा यांनी मुंबई फेस्टिवलच्या आयोजनाची घोषणा केली. तसेच मुंबई जवळच्या वज्रेश्वरी मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यासाठी विभागाने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) धोरण स्वीकारले असून या माध्यमातून ज्या संस्था पुढे येतील त्यांना जागा आणि आवश्यक त्या परवानग्या देण्यात येतील. नजीकच्या काळात पर्यटन विभागाला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाहीही लोढा यांनी दिली.

तेलगू, बंगाली साहित्य अकादमी : मुनगंटीवार

दरम्यान, राज्यात आता सिंधी, हिंदी, गुजराती साहित्य अकादमीच्या पाठोपाठ तेलगू आणि बंगाली साहित्य अकादमी सुरु करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या उत्तरात केली. महाराष्ट्रात आधुनिक संग्रहालय स्थापन करतानाच राज्यातील वारसा स्थळांसाठी जिल्हा नियोजन विकास निधीतून ३ टक्के निधी दिला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here