मुंबई उपनगरात १६.९ मिमी
Twitter : @maharashtracity
मुंबई: मुंबईत मंगळवारी झालेल्या पावसाने मार्च महिन्यातील यापूर्वीच्या पावसाच्या नोंदीचा रेकॉर्ड ब्रेक केला. मंगळवारी मुंबई उपनगरात १६.९ मिमी तर शहरात २५.४ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. दरम्यान, उपनगरातील मंगळवारच्या पावसाच्या नोंदीच्या तुलनेत या पूर्वी १० मार्च २००६ या वर्षात १३.१ मिमी एवढा सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला होता. तर त्याही पूर्वी ११.९ मिमी एवढी मार्चमधील सर्वाधिक पावसाची नोंद होती. काल त्याचा रेकॉर्ड मोडला. यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली होती.
मुंबई वेधशाळेकडून देण्यात आलेल्या पाऊस नोंदीप्रमाणे मंगळवारी वांद्रे १३.० मिमी, दहिसर २९.० मिमी, जुहू २१.० मिमी, भायखळा ३१ मिमी, सायन २४.५ मिमी, भाईंदर १३.० मिमी, मीरारोड १०.५ मिमी अशी नोंद होती. मात्र यामुळे मुंबईकरांची त्रेधा उडाली होती. पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह गडगडाट हि ऐकायला मिळाला. ठाणे, पालघर, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवली असा मुंबई महानगर प्रदेशातील बहुतांश ठिकाणी पाऊस झाला. पावसाचा परिणाम चाकरमान्यांची गैरसोय झाली. पावसामुळे लोकल सेवांवर परिणाम होऊन लोकल धीम्या गतीने सुरु होत्या. यामुळे कार्यालयात जाणाऱ्या चाकरमान्यांना धावपळ करावी लागली.