मुंबई महापालिकेवर मोर्चा

By Anant Nalavade

Twitter : @NalavadeAnant

मुंबई: मुंबई महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाल्याचा आरोप करत या घोटाळ्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मोर्चा शनिवारी मुंबई महापालिकेवर धडकणार आहे. शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे गट (Thackeray faction of Shiv Sena) जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असून त्याद्वारे शिंदे गट आणि भाजपला थेट आव्हान देण्याचा प्रयत्न यावेळी होणार आहे. गेल्या वर्षी राज्यातील सत्तेतून पायउतार झाल्यानंतर ठाकरे गट आज प्रथमच रस्त्यावर उतरणार असून या मोर्चाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कॅगने (CAG) ठपका ठेवलेल्या मुंबई महापालिकेतील कथित १२ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील विशेष चौकशी समितीद्वारे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC elections) तोंडावर ठाकरे गटाची कोंडी करण्याची शिंदे गटाची रणनीती आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात मुंबई महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरण, स्ट्रीट फर्निचर आणि खडी कामात घोटाळा झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी करत १ जुलै रोजी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या मोर्चात उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते, खासदार, आमदार, माजी नगरसेवक सहभागी होणार आहेत.

ठाकरे गटाचा मोर्चा दुपारी तीन वाजता मेट्रो सिनेमा येथून निघेल. हा मोर्चा मुंबई महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या दिशेने धडकल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर होईल. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) संबोधित करतील. मोर्चा यशस्वी करण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे. मोर्चाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी ठाकरे गटाने मुंबईत बॅनरबाजी केली आहे. याशिवाय समाज माध्यमांत जोरदार प्रचार केला आहे. या मोर्चात सर्वसामान्य नागरिकांना सामावून घेताना ठाकरे गटाने मुंबईतील सर्व विभाग प्रमुख, विधानसभा समन्वयक, शाखाप्रमुख ,गट प्रमुख, महिला आघाडीचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मोर्चात सहभागी होण्याच्या सूचना केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here