By Sadanand Khopkar
Twitter : @maharashtracity
मुंबई: इतिहास संशोधन आणि लेखन करणे सध्याच्या काळात धाडसाचे आहे. इतिहासातील प्रसंग, घटना या शतकांपूर्वी घडून गेल्या आहेत. त्यात आता बदल होऊ शकत नाही, हे मान्य केले पाहिजे. इतिहास लेखन करण्यापूर्वी वस्तुनिष्ठ इतिहास समजून घेऊन मांडणे महत्त्वाचे आहे. वाचाल तर वाचाल हे सत्य आहे. “नो डॉक्युमेंट नो हिस्टरी” या मुलभूत तत्त्वानुसार इतिहास संशोधन, लेखन व्हावे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
निवृत्त पुराभिलेख संचालक आणि इतिहास संशोधक डॉ. भास्कर धाटावकर लिखित “छत्रपती संभाजी महाराज”, “सरखेल कान्होजी आंग्रे”, “सफर कॅनडा आणि अमेरिकेची”, आणि “आंग्रेकालीन अलिबाग परिसरातील ऐतिहासिक स्थळे” या चार पुस्तकांचे प्रकाशन चव्हाण यांच्या हस्ते झाले.
विलेपार्ले पश्चिम येथील गोल्डन गेट हाॅल मध्ये २८जून रोजी सायंकाळी डॉ. धाटावकर यांच्या सत्तराव्या वाढदिवस अभिष्टचिंतनपर कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा चार पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. अत्यंत शांत, संयमी, अभ्यासू संचालक अशी डॉ. धाटावकर यांची कारकीर्द होती, या शब्दात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी डॉ. धाटावकर यांचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थितांचे स्वागत डाॅ धाटावकर यांनी केले. प्रास्ताविकात आपले बालपण, इतिहासाची आवड, संशोधन कार्याचा प्रवास, पुराभिलेख विभागात मोडी लिपी प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्य़ात मोडी प्रशिक्षण वर्गांचे आयोजन तसेच अभ्यासातून विविध विषयांवरील सव्वीस पुस्तकांच्या लेखन प्रपंचाची माहीती दिली.
माजी माहिती जनसंपर्क संचालक देवेंद्र भुजबळ, मुंबई विद्यापीठाचे माजी इतिहास विभाग प्रमुख डॉ. अरविंद गणाचारी, ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक राजन बने, ज्येष्ठ पत्रकार, लेखक, मावळ मराठाचे संपादक सदानंद खोपकर यांनी या प्रसंगी डाॅ. भास्कर धाटावकर यांच्या संशोधनपर लेखना संदर्भात तसेच त्यांच्या मनमिळाऊ, विनम्र, मदतीस सदातत्पर स्वभावाविषयी आठवणी जागविल्या. तसेच त्यांचे पुस्तकांचे शतक पूर्ण व्हावे, अशा शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिनेसृष्टीतील आणि मालिकांतील प्रसिद्ध अभिनेते अभय कुलकर्णी यांनी अत्यंत खुमासदार व दिलखुलास शैलीत केले. आभार प्रदर्शन सौ. उषा धाटावकर आणि सुपूत्र राहुल धाटावकर यांनी केले. या कार्यक्रमास अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.