पाण्यामुळे अंधेरी सबवे वाहतूक वळवली
Twitter: @the_news_21
मुंबई: मुंबईसाठी बुधवारी सकाळी येलो अलर्ट घोषित करण्यात आला होता. मात्र दुपारच्या सत्रात हा येलो अलर्ट त्वरीत बदलत मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला. दरम्यान मंगळवारच्या अर्धविश्रांतीनंतर मुंबईच्या पावसाने बुधवारपासून पुन्हा संततधार सुरु केली. त्यामुळे हवामानशास्त्र विभागाने दिलेला इशारा तंतोतंत खरा ठरला पावसाने मुंबईला पुन्हा झोडपून काढले. दरम्यान, आजहि एकाचा झाड कोसळून मृत्यू झाल्याचे पालिकेने सांगितले.
मुंबई शहर तसेच उपनगरांत बुधवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. अंधेरी सबवेत पाणी भरल्याने येथील वाहतूक इतर मार्गावर वळवण्यात आली. गोरेगाव पश्चिमेकडे घरावर झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. मात्र रेल्वे वाहतूक सुरळीत राहिल्याने त्यांना कामावर पोहचता आले. रस्त्यावरच्या वाहतुकीचा वेग मात्र मंदावला होता. दरम्यान, हवामान विभागाने येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान अंधेरी सबवेत पहिल्याच पावसात पाणी साचले होते. बुधवारी देखील तेच चित्र होते. पावसाचे पाणी साचल्याने हा सबवे बंद ठेवण्यात आला होता. सायन किंग्ज सर्कल, भांडूप, साकीनाका, गांधी मार्केट, दादर टीटी, चेंबूर येथील शेल कॉलनी, कुर्ला, घाटकोपर, दहिसर, धारावी, विद्याविहार, भांडुप, विक्रोळी, मालाड- मालवणी, गोरेगाव, मुलुंड आदी सखल भागात पाणी साचले.
दरम्यान, बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान शास्त्र विभागाकडून करण्यात आला होता. त्याचवेळी मुंबई, उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यात आगामी चार तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. हा इशारा देत असतानाच मुंबईतील येलो अलर्ट आरेंज अलर्टमध्ये रूपांतरित करण्यात आला. बुधवारी सकाळी साडे आठ ते साडे अकरा पर्यंत कुलाबा वेधशाळेत ५७.०० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर त्याचवेळी उपनगरात ३६.० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. याचाच अर्थ सकाळी शहरात पावसाचा जोर होता. तर दुपारी अडीच वाजता केलेल्या नोंदीनुसार कुलाबा येथे ७५.६, सांताक्रुझ ७४.२ मिमी अशी नोंद करण्यात आली. त्याचवेळी दहिसर १४८.५ मिमी पाऊस झाला. ही सहा तासातील पावसाची नोंद होती. तसेच भाईंदर १२२.५ मिमी, जुहू ऐअरपोट येथे ६९.५ मिमी तर राम मंदिर ७३ मिमी एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली. तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत सांताक्रुझ येथे ७७ मिमी एवढी पावसाची नोंद करण्यात आली.
झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू :
गोरेगाव पश्चिमेकडील जुनी बीएमसी कॉलनी, मिठा नगर, दत्त मंदिर, म. गांधी मार्ग या ठिकाणी झाडाची एक फांदी घरावर कोसळली. यात एक व्यक्ति जखमी झाला. त्या व्यक्तिला प्रार्थना या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या व्यक्तीचे नाव प्रेमलाल निर्मल असे असून त्याचे वय ३० वर्षे होते. त्याला मृत घोषित करण्यात आले, असे प्रार्थना हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पडझड आणि झाड कोसळणे :
मुंबई शहरात ४ ठिकाणी, उपनगरांत ८, पश्चिम उपनगरांत १४ अशा २६ ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या कोसळल्या. तर शहरात १, पूर्व उपनगरांत ३ व पश्चिम उपनगरांत १ अशा पाच ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या.
अंधेरी सबवे बंद :
जोरदार पावसामुळे अंधेरी सबवेत पाणी तुंबल्याने हा सबवे बंद ठेवण्यात आला होता. येथील वाहतूक एस. व्ही मार्गाने वळवण्यात आली. वाहतुक खोळंबल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. महापालिकेने येथे पंप लावून पाण्याचा निचरा केल्याने काही वेळात येथील वाहतूक सुरळीत झाली.