भाजपा शिक्षक आघाडीची शिक्षण निरीक्षकांकडे मागणी
Twitter: @the_news_21
मुंबई: शाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेल्यावर सुद्धा शाळांना वर्षभराच्या नियोजनासाठी लागणारी सुट्यांची यादी अजूनही घोषित झाली नसल्याने नियोजनाला घेऊन शिक्षक वर्गात नाराजी आहे. त्यामुळे शिक्षण निरीक्षक कार्यालयाने तातडीने सुट्यांची यादी प्रसिद्ध करण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे.
याबाबत अनिल बोरनारे यांनी बृहन्मुंबई उत्तर पश्चिम व दक्षिण विभाग शिक्षण निरीक्षकांकडे निवेदन पाठवून ही मागणी केली आहे. दरवर्षी माध्यमिक शाळा संहिता ५२ (२) नुसार शिक्षण निरीक्षक कार्यालयांकडून सुट्यांची यादी जाहीर करण्यात येते. या यादीवरून शाळा व ज्यु कॉलेजला त्यांचे नियोजन, वर्षभरातील चाचणी, सहामाही, वार्षिक परीक्षा, वर्षभराचे विविध उपक्रम ज्यामध्ये खेळ, स्पर्धा, स्नेहसंमेलन, खेळ महोत्सव, थोर व्यक्तिमत्वाच्या जयंती, पुण्यतिथी यासोबत अनेक उपक्रमांचे नियोजन करण्यात येते. या नियोजनासाठी सुट्यांची यादी गरजेची असते. त्यामुळे सर्व अनुदानित, विना अनुदानित, अंशतः अनुदानित व सेल्फ फायनान्स शाळांसाठी सुट्यांची यादी जाहीर करण्यात यावी अशी मागणी अनिल बोरनारे यांनी केली आहे.