दुमजली इमारतीचा भाग कोसळून दोघांचा  मृत्यू; २ जखमी

मुख्यमंत्र्यांकडून मिलन सबवेची पाहणी

Twitter: @maharashtracity

मुंबई: मुंबईत शनिवारपासून सुरु झालेल्या पावसाने पहिल्याच दिवशी धुमशान घातले. तीव्र पावसाचा परिणाम दुसऱ्या दिवशी ही झाले. यात पार्ले येथे दुमजली इमारतीचा भाग कोसळल्याने दोघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर राजावाडी परिसरात बंगल्याचा भाग कोसळल्याने दोन जण धिगाऱ्याखाली फसले होते. 

दरम्यान, शनिवारच्या पावसाने अंधेरी मिलन सबवे या ठिकाणी पावसाच्या काळात हाहाकार स्थिती झाली होती. मात्र या ठिकाणी काळजी घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने तयारी सज्ज असल्याचे सांगितले. शनिवारी पावसाच्या पाण्यातून एका बाईला मार्ग काढतानाचा व्हीडिओ काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी ट्विट केला. सध्या या ठिकाणी काळजी घेण्याच्या सूचना पालिकेकडून देण्यात येत आहेत.

पहिल्या पावसाने दिवशी मुंबईला झोडपले :

यंदा मुंबईची तुंबई होणार नाही, या दाव्याला दावा पहिल्याच पावसाने छेद दिला. मुंबईच्या अनेक सबवेंमध्ये पाणी भरल्याचे पावसात पाहायला मिळाले. मुंबईतील अंधेरी सब वे येथे शनिवारी रात्री पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. कमरेएवढ्या भरलेल्या पाण्यातून तिथल्या रहिवाशांनी मार्ग काढला. अनेक चारचाकी गाड्यांना तिथे उपस्थित असलेल्या ट्रॅफिक हवालदारांना धक्का मारावा लागला. दुचाकीस्वारांनी ही साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण केले. एका नदीला पूर यावा यासारखे दृश्य मिलन सबवे परिसरात पाहायला मिळाले. 

अचानक आलेल्या पावसामुळे अंदाज न आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मात्र या सर्व परिस्थितीचा फटका बसला. दरम्यान, पावसाचा रात्री जोर कमी झाल्याने काही तासांत हे पाणी ओसरायला सुरूवात झाली आणि सकाळपर्यंत ही परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आल्याचे तिथल्या स्थानिक नागरिकांनी साांगितले. शिवाय, पहिल्या पावसात कायम मिलन सबवे भरतोच अशी प्रतिक्रिया तिथल्या स्थानिक नागरिकांनी दिली आहे. दरम्यान, रविवारी पावसाने उसंत घेतल्याने मुंबईत दुसऱ्या दिवशी कुठेही पाणी भरले नसल्याचे चित्र होते.

विलेपार्ले येथे इमारत कोसळून दोन ठार :

मुंबईच्या विलेपार्ले परिसरातील नानावटी हॉस्पिटलजवळील दोन मजली इमारत रविवारी दुपारी कोसळली. या दुर्घटनेत दोन वृध्द नागरिकांचा मृत्यू झाला असून दोघा जखमींवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्रिस्किला मिसौइटा आणि रॉबी मिसौइटा अशी मृतांची नावे आहेत. इमारतीत अडकलेल्या एकूण ४ जणांना बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

विलेपार्ले पश्चिम परिसरात दुपारी 2:27 वाजता सेंट ब्राझ रोडवर, नानावटी हॉस्पिटलजवळ तीन मजली इमारत कोसळली. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. बचावकार्यात चार रहिवाशांना ढीगाऱ्याबाहेर काढण्यात आले आणि नजीकच्या कूपर रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रिस्किला मिसौइटा आणि रॉबी मिसौइटा या दोन वृध्द नागरिकांना उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले. इतर जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्र्यांकडून मिलन सबवेची पाहणी:

पावसामुळे सांताक्रुझ, मिलन सबवे या सखल भागामध्ये पावसामुळे दरवर्षी पाणी साचून वाहतूक कोंडी होते. कालपासून मुंबईत सुरु झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागातील कार्यान्वित असलेल्या यंत्रणेची पावसात जावून प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच मुंबईत ज्या सखल भागामध्ये पावसाच्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी होते अशा ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले. 

मुख्यमंत्री म्हणाले, मिलन सब- वे या भागात पावसाळ्यात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास होतो. यावर्षी पाण्याचा निचरा करण्यासाठी हजारो लिटर क्षमतेचे वॉटर टॅंक कार्यान्वित करण्यात आले आहेत. सकल भागातील पाणी पंपिंग द्वारे उचलून साठवण टाक्यांमध्ये साठवण केले जात आहे. त्यामुळे येथे वाहतूक व्यवस्था सुरळीत आहे. याच धर्तीवर मुंबईतील इतर ठिकाणच्या सखल भागात सुध्दा अशी यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश दिले. 

मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन वॉर रुममधील यंत्रणा मुंबईत सुरु झालेल्या पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जाऊ लागू नये याची दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. यावेळी मुख्यमंत्री यांनी रविवारी सकाळी मुंबईतील वरळी येथील कोस्टल रोडचे काम सुरु असलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. पाणी साचण्याची कारणे जाणून घेतानाच या भागात पाणी साचू नये यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

राजावाडी कॉलनीत दुमजली इमारतीचा भाग खचला :

मुंबईमधील विद्याविहार येथील राजावाडी कॉलनी येथे दुमजली इमारतीचा भाग खचला. या ठिकाणी दोन जण अडकून पडले. घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफ दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत एकूण चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी जखमींना नजिकच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत ९४ वर्षीय अलका पालांडे ही वृद्ध महिला आणि नरेश पालांडे हा एक पुरुष ढिगाऱ्याखाली अडकले असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल होत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अलका पालांडे यांचे नातेवाईक शरद पालांडे यांनी बोलताना माहिती दिली की, दुमजली बंगला असून खाली बेसमेंटमध्ये कार पार्किंगसाठी जागा होती. तीन कुटुंब या बंगल्यात राहत असून तळमजल्यावर राहत असणारे अलका आणि त्यांचा मुलगा नरेश पालांडे हे ढिगाराखाली अडकले आहेत. इतर पाच-सहा अडकलेल्या लोकांना बाहेर काढले असल्याची माहिती देखील शरद पालांडे यांनी पुढे दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here