राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते अॅड. अमोल मातेले यांचा सवाल

By Sadanand Khopkar

Twitter : @maharashtracity

मुंबई: शिवसेना शिंदे गटाकडून एमएमआरडीए मैदानावर ४ ऑक्टोबर २०२२ ला भव्य दसरा मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमावर करदात्या सामान्य मुंबईकरांचे कोट्यवधी रुपये मुंबई महानगरपालिकेने खर्च केले असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अॅड.अमोल मातेले यांनी पुराव्यानिशी केला आहे.

या कार्यक्रमाचे एमएमआरडी मैदानाचे शुल्क हे मुंबई महानगरपालिकेने भरले आहे. शासकीय, निमशासकीय, धार्मिक अथवा राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमासाठी महानगर पालिकेस निधी खर्च करता येतो. परंतु शिंदे गटाचा दसरा मेळावा वरील पैकी कोणत्या कार्यक्रमात बसतो, असा सवाल मातेले यांनी उपस्थित केला.

या मिळाव्यासाठी येणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांच्या पार्किंगसाठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाची जागा देण्यात आली होती. विद्यापीठाची जागा राजकीय कार्यक्रमाला देणे हे मुळात योग्य आहे का? एमएमआरडीकडे अनेक ठिकाणी पार्किंगसाठी मैदान आहेत ,मग मुंबई विद्यापीठाचीच जागा का? असा प्रश्न उपस्थित करत मातेले पुढे म्हणाले की, या कार्यक्रमाच्या पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणावर विद्यापीठाच्या मैदानातील झाडांची कत्तल करण्यात आली. इतकेच नव्हे तर, विद्यापीठाची संरक्षण भिंत देखील तोडण्यात आली. त्यासाठी महापालिकेची यंत्रणा वापरण्यात आली. नंतर संरक्षण भिंत पुन्हा बांधण्यात आली, यासाठी पुन्हा मुंबईकरांचा निधी खर्च करण्यात आला.

मेळाव्यासाठी आलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या शौच व्यवस्थेचा खर्च देखील मुंबईकरांच्या माथी मारण्यात आला असल्याचा आरोप मातेले यांनी केला आहे. ते म्हणाले, दसरा मेळाव्याच्या ठिकाणी फिरते शौचालय व बाथरूम यासाठी चार तारखेला निविदा काढून त्याच दिवशी ती मंजूर करण्यात आली. त्यासाठी मुंबईकरांच्या कराचे ९७ लक्ष रुपये खर्च करण्यात आले. दसरा मेळाव्यासाठी जर सुविधा द्यायच्या होत्या तर नियमाप्रमाणे आधी निविदा काढणे नियोजित होते. याबाबत महापालिकेच्या दक्षता विभागाने ताशेरे ओढले असल्याचे मातेले यांनी सांगितले. दसरा मेळाव्याच्या दिलेल्या कामाबाबत परीक्षण करण्याकरिता दक्षता विभागासही कळविण्यात आलेले नाही. याबाबत दक्षता विभागाकडून (Vigilance Department) दंड ठोठवण्यात आल्याचे अॅड.अमोल मातेले यांनी सांगितले.

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्या करता नियम डावलून खर्च करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे. तसेच झालेला खर्च, कष्टकरी करदात्या मुंबईकरांच्या खिशातून न करता, संबंधित दसरा मेळाव्याच्या आयोजकांकडून अथवा पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वसूल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अॅड.अमोल मातेले यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here