Twitter : @maharashtracity
मुंबई
लोकांना इतिहासात गुंतवून ठेवायचे आणि देश-राज्याचे भविष्य मारायचे हे अत्यंत घातक असल्याचा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला लगावला. आपण भविष्याकडे न पाहता इतिहास उगाळत बसलो आहोत. त्यातून आपल्याला काहीही मिळणार नाही, असे सांगतानाच भिडे गुरूजींनी विद्यार्थ्यांना चांगले धडे द्यावेत, असा टोलाही त्यांनी लगावला. बुधवारी उद्धव ठाकरे पावसाळी अधिवेशनासाठी विधीमंडळात आले असताना त्यांनी विधिमंडळात पत्रकारांशी संवाद साधला.
दरम्यान, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, संभाजी भिडेंबाबत मी काय बोलणार? प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीवर मीच प्रतिक्रिया कशी काय देणार, असेही ते म्हणाले. भिडे यांचे वक्तव्य योग्य आहे की अयोग्य हे राज्यकर्त्यांनी स्पष्ट सांगितले पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर भिडे यांना गुरुजी म्हणत असतील तर त्यांचं सगळंच बरोबर असं म्हटलं पाहिजे असे ठाकरे म्हणाले.
देशात मणिपूर आणि हरियाणासारख्या घटना घडत असतील, महिलांचा अशाप्रकारे अपमान आणि बदनामी होत असेल तर भाजप देश चालवू शकत नाही, हेच सिद्ध होते. हे रामराज्य आहे का? असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. मणिपूरमध्ये महिला राज्यपाल आहेत. देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत. असे असताना मणिपूरमध्ये महिलांवर अशा प्रकारचे अन्याय होत असेल तर हे दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले. अशा प्रकारच्या बदनामीकारक घटना घडत असतील तर डबल इंजिन सरकार काय, करीत आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
समृद्धी महामार्गावरचे अपघात आणि त्यात अशा प्राणघातक त्रुटी राहू शकतात, हे धक्कादायक असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्रात फोडाफोडी करून भाजपने सत्त्ता स्थापन केली. कर्नाटकात जनतेने संयम राखत जनतेने भाजपला हद्दपार केले. महाराष्ट्रातही जनता भाजपला जागा दाखवून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नीलम गोऱ्हे याना टोला
शिवसेनेने महिलांचा सन्मान केला असून राज्यात शक्ती विधेयक आणण्यासाठी सेनेने पुढाकार घेतला. विधान परिषदेत उपसभापती पदावर सेनेनेच महिलेला बसवले. शक्ती कायदाही आणला होता. शिवसेनेने ज्यांना महिला म्हणून विधान परिषदेच्या उपाध्यक्षपदी बसवलं त्यांच्याकडून चर्चाच न होऊ देणं ही वागणूक अनपेक्षित असून त्यांच्या विचारसरणीत इतका कसा काय बदल झाला? असा टोलाही त्यांनी नीलम गोऱ्हे याना लगावला.