Twitter : @milindmane70

महाड

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी मोठ्या परताव्याचे अमिष दाखवून लोणेरे येथील एका व्यवसायिकासह पाच जणांना 26 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या चार संचालकांवर महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शेअर मार्केटमध्ये फसवणूक झालेल्या व्यवसायिकाचे नाव नंदकुमार नारायण पवार (राहणार लोणेरे) माणगाव असे असून त्यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नोव्हेंबर 2021 ते 23 जून 2023 या कालावधीमध्ये हा प्रकार घडला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार आपला ॲडव्हायझरी प्रायव्हेट लिमिटेड व ट्रस्ट इंटरप्राईजेस प्रायव्हेट लिमिटेड या नावाच्या  शेअर ट्रेडिंग कंपन्याचा चार संचालकांनी पवार यांच्या घरी जाऊन तसेच महाडजवळील चांभार खिंड येथे मीटिंग घेऊन पवार यांच्यासह अन्य पाच जणांना आपल्या कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले तर 40 ते 45 टक्के फायदा होतो असे अमिष दाखवले.  

त्यांच्या या भूलथापांना बळी पडून पवार यांच्यासह अन्य पाच जणांनी त्यांच्या शेअरमध्ये गुंतवण्यासाठी 26 लाख रुपये कंपनीच्या नावाने रोख तसेच चेक स्वरूपात भरणा केले. यानंतर त्यांना कंपनीकडून एक वर्षाचा बाँड करून देण्यात आला होता. परंतु एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी दिलेली रक्कम तसेच त्यावर झालेला फायदा अशी कोणत्याही स्वरूपाची रक्कम नंदकुमार पवार व इतरांना कंपनी व संचालकानी परत न देता ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरली.

शेअर मार्केट मध्ये फसवणूक झालेल्या पवार यांच्या तक्रारीनुसार संजय गायकवाड, मनोज तेटगुरे, देवेंद्र गायकवाड व संदेश कवडे (सर्व राहणार माणगाव) या सर्वांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार लांगे करत आहेत. आता फसवणूक झालेल्यांना आपला परतावा परत मिळतो की काय हे तपासानंतर स्पष्ट होईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here