Twitter : @maharashtracity

मुंबई 

बोरिवली येथील मुंबई महानगरपालिकेच्या कॉम्प्रिहेन्सिव थॅलासेमिया केअर, बालरोग रक्तदोष, कर्करोग आणि बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्रात तब्बल ३०० बालकांचे बोनमॅरो प्रत्यारोपण (बीएमटी) करण्यात आले आहे. अतिशय क्लिष्ट असलेले बोनमॅरो प्रत्यारोपण करून या केंद्राने मागील ५ वर्षात अशा अनेक बालकांचे जीवन सुसह्य केले. बोनमॅरो प्रत्यारोपणामुळे थॅलासेमिया रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात असा आदर्श पालिकेच्या केंद्राने ठेवला आहे. 

दरम्यान, उपचार केंद्राच्या संचालिका डॉ. ममता मंगलानी यांनी सांगितले कि, थॅलेसिमियाग्रस्त रूग्णांमध्ये योग्य त्या प्रमाणात लाल रक्त पेशी तयार होत नसल्याने त्यांना नियमितपणे रक्त देण्याची गरज असते. मात्र, या रूग्णांना अनुरूप बोनमॅरोचे प्रत्यारोपण यशस्वीपणे करण्यात आल्याने या बालकांचे शरीर आवश्यक त्या प्रमाणात लाल रक्त पेशी तयार करू लागते. तसेच रक्ताचा कर्करोग म्हणजे लुकेमीया आणि अनेक इतर कर्करोगांसाठी देखील या केंद्रात बोनमॅरो प्रत्यारोपण व इतर संबंधित उपचार केले जातात. यानुसार गेल्या पाच वर्षात तब्बल ६ हजारांपेक्षा अधिक बालकांवर विविध स्तरीय उपचार करण्यात आले असल्याचे डॉ. मंगलानी यांनी सांगितले.  

बोनमॅरो प्रत्यारोपण केंद्राच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य), संजय कुऱ्हाडे यांनी या केंद्राच्या कामाचे कौतुक केले आहे.

सीटीसी, पीएचओ व बीएमटी उपचार केंद्र अविरतपणे कार्यरत :

मुंबईकर नागरिकांना महानगरपालिकेचे कॉम्प्रिहेन्सिव थॅलासेमिया केअर, बालरोग, रक्तदोष, कर्करोग आणि बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्र अर्थात सीटीसी, पीएचओ व बीएमटी उपचार केंद्र हे अविरतपणे कार्यरत आहे. याचाच एक भाग म्हणून थॅलेसिमियाग्रस्त, रक्तदोषाने आणि कर्करोगानेग्रस्त बालकांना सामान्य बालकांप्रमाणे जीवन जगता यावे, या उद्देशाने २०१७ साली महानगरपालिकेने बोरिवली (पूर्व) परिसरात हे उपचार केंद्र सुरू केले. या केंद्रात जून २०१८ पासून बोनमॅरो प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सीटीसी, पीएचओ आणि बीएमटी उपचार केंद्रात जून २०१८ पासून २६ जुलै २०२३ पर्यंत तब्बल ३०० बोनमॅरो प्रत्योरोपणाची (बोन मॅरो ट्रान्सप्लांट / बीएमटी) कार्यवाही पूर्ण करण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे. या केंद्रात दरवर्षी सुमारे ६० ते ८० प्रत्यारोपण केले जातात. यामध्ये ‘अॅलोजेनिक’ आणि ‘ऑटोलॉगस’ प्रत्यारोपण या दोन्हीं प्रक्रियांचा समावेश आहे. या केंद्रात डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी मिळून सुमारे १६८ एवढे मनुष्यबळ कार्यरत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here