Twitter : @maharashtracity

मुंबई

नेमक्या जागी नेमका शब्द लिहीणारा आणि लिहिलेला शब्द कधी न खोडणारा प्रचंड ताकदीचा संपादक म्हणजे आचार्य अत्रे, या शब्दात आचार्य अत्रेंच्या हाताखाली दहा वर्षे दैनिक ‘मराठा’मध्ये सेवा करण्याची संधी लाभलेल्या ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी अत्रेंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

मराठाकार आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या जयंतीपासून वर्षभरात महाराष्ट्रात १२५ व्याख्याने देण्याचा संकल्प भावे यांनी जाहीर केला होता. त्याचा शुभारंभ त्यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघातून केला. कवी अत्रे ते संपादक अत्रे या प्रदीर्घ जीवन प्रवासाचा कालखंड उलगडताना भावे यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन सोडले. अत्रेंचे शब्द म्हणजे पारिजातकाच्या फुलांचा सडा, असे वर्णन करताना मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र साकार करण्यासाठी जीवाचं रान केलेल्या आचार्य अत्रे आणि ‘जागा मराठा; आम जमाना बदलेगा’, अशी पोवाड्यातून गर्जना करणाऱ्या शाहीर अमरशेख यांना आतातरी राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

भावे म्हणाले, अत्रे म्हणजे कविता, प्रस्तावना, विनोद, नाटक, सिनेमा, पत्रकार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा झुंजार नेता, दशसहस्रेषू वक्ता, लोकप्रतिनिधी यासह जवळजवळ दहा कलांचे विद्यापीठच होय. अशा विद्यापीठात शिकण्याचे भाग्य लाभले, याबद्दल स्वतःला भाग्यवान समजतो. बेळगाव, कारवार, निपाणीचा संयुक्त महाराष्ट्रात समावेश नाही, याबद्दल आमदारकीचा राजीनामा दिलेले ते एकमेव आमदार होते. संयुक्त महाराष्ट्राच्या शत्रुंना त्यांनी कधीही माफ केले नाही, अक्षरशः लेखणीतून सोलून काढले. त्यांनी दिलेल्या शिव्यासुद्धा लोकांना गोड वाटत आणि त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी लोक ‘मराठा’ विकत घेत. आज असे किती संपादक आहेत? असा सवालही भावे यांनी केला.

ते म्हणाले, तो काळ वेगळा होता, ती माणसे वेगळी होती. विरोधकसुद्धा एकमेकांना कडकडून भेटत. विरोधकांना शत्रू मानले जात नसे. तो दिशा देणारा महाराष्ट्र आज उरला आहे का? महाराष्ट्रासाठी लढले कोण, मेले कोण आणि गब्बर झाले कोण, असा सवाल करतानाच आज पत्रकारितेला पुन्हा एकदा विश्वासार्हता मिळवून देण्याची मोठी जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल असेही ते म्हणाले.

मुंबई मराठी पत्रकार संघ अध्यक्ष, शिवनेरकार नरेंद्र वाबळे यांनी यावेळी स्वागत व प्रास्ताविक केले. लेखणीच्या बळावर एक राज्य साकार करणारे जगातील एकमेव उदाहरण म्हणजे आचार्य अत्रे या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here