Twitter : @maharashtracity
मुंबई
सध्या मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे रुग्णालयांना तसेच रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी रुग्णालयातील सर्व विभाग, कक्ष यांची स्वच्छता राखण्यासाठी अचानक भेट देऊन पाहणी करत आहेत. यात पदाचा बडेजवापणा न आणता सर्वसाधारण नागरिकाप्रमाणे सर्व बाबतीत काटेकोरपणे पाहणी करून त्याबाबतच्या सूचना देऊन आरोग्य विभागाची प्रतिमा उंचावण्याचे काम करीत आहेत. याबद्दल डॉ. शिंदे यांचे अभिनंदन करत म्युनिसिपल युनियनने कामगारांच्या इतरही मागण्यांकडे तसेच वस्तु पुरवठ्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. युनियनने अभिनंदनासह रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा पाढा वाचून दाखवला.
यावर बोलताना म्युनिसिपल मजदूर युनियनचे प्रदीप नारकर यांनी सांगितले की, सध्या रुग्णालयांच्या स्वच्छतेचे काम पाहून कामगारांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या समस्या, अडचणी व मागण्याबाबत त्वरित निराकरण होतील, अशी आशा निर्माण झाली आहे. परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा मिळत असल्याने गरिब रुग्ण महापालिका रुग्णालयातून उपचार घेण्यासाठी येतात. तसेच पालिकेकडून सुविधा उपलब्ध होत असल्या तरी देखील रुग्णसंख्येच्या तुलनेत रुग्णालये, दवाखाने, प्रसूतीगृह, सुतिकागृह अपुरी पडत आहेत. खाटांची संख्या व दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे असलेल्या खाटा अपुऱ्या पडत आहेत.
के. ई .एम., सायन, नायर व कुपर, राजावाडी, भगवती, भाभा तसेच शताब्दी रुग्णालयांसह सर्व छोट्या मोठ्या रुग्णालयांमध्ये जेवढे रुग्ण खाटेवर ठेवले जातात, त्यापेक्षा अधिक रुग्णांना खाटांअभावी व्हरांड्यात फ्लोअर बेडवर ठेवले जात असल्याचे चित्र असते. रुग्ण वाढ होत असताना कामगार संख्येत मात्र वाढ झालेली नाही. उलट सेवानिवृत्त झालेल्या कामगार कर्मचाऱ्यांची पदे भरली जात नाहीत. यामुळे रुग्णांच्या वाढलेल्या संख्येमुळे कामाचा प्रचंड ताण सहन करावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगामध्ये राहून गेलेल्या त्रुटी व उणिवा दूर करणे, सातवा वेतन आयोग करार संपूर्ण भत्यासहित लागू करणे, बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थितीची नोंद व त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी, सामुदायिक वैद्यकीय गट विमा योजना लागू करून घेणे, रुग्णालयात दिवसेंदिवस वाढत असलेले खाजगीकरण-कंत्राटीकरण कायमस्वरूपी बंद करून कायम कामगारांची नेमणूक करून घेणे, त्याचप्रमाणे अत्याधुनिक नवीन यंत्रसामुग्री तसेच नवीन कक्ष, आय सी. यू., ई. एम. एस., शस्त्रक्रिया विभाग या ठिकाणी लागणारे सर्व संवर्गातील कार्मचारी पदे निर्माण न करता असलेल्या कायम कामगार, कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त काम करून घेतले जात आहे. या बाबींचा गांभीर्याने विचार करून कार्यवाही करावी अशी मागणी म्युनिसिपल मजदुर युनियनकडून करण्यात आली आहे.