By Sadanand Khopkar

Twitter : @maharashtracity

मुंबई: सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहामध्ये घडलेल्या घटनेच्या तपासासाठी गठीत केलेल्या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार या वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन करण्यात येत आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्री पाटील यांनी आज मृत विद्यार्थीनीच्या कुटूंबियांची दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भेट घेतली. त्यांचे सांत्वन करून न्याय देण्याचे आश्वासन यावेळी पाटील यांनी दिले. ते म्हणाले, या घटनेची शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. त्याच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार वसतिगृहाच्या अधीक्षिका यांचे निलंबन करण्यात येत आहे.

यावेळी मंत्री पाटील यांनी कुटूंबियांना तपासाची सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांना मदत म्हणून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. कुटुंबीयांनी खचून जाऊ नये, त्यांना मदत व्हावी, म्हणून त्यांच्या मुलाला कंत्राटी पद्धतीने तात्पुरती नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षेचा सखोल आढावा घेऊन महिला सुरक्षा रक्षक देण्यात येईल, असेही यावेळी त्यांनी सांगितले. रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर, मृत विद्यार्थीनीचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here